संतोष प्रधान
बिगर भाजप आणि काँग्रेस आघाडी स्थापन करून त्याचे नेतृत्व करण्याच्या योजनेचा भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या नेतृत्वाशी ते चर्चा करणार आहेत. मात्र त्यांच्या या योजनेला आतापर्यंत तरी फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याने चंद्रशेखर राव यांची महत्त्वाकांक्षा कितपत पूर्ण होते याबाबत साशंकताच व्यक्त होत आहे.
चंद्रशेखर राव हे रविवारी चंदिगड येथे पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर कार्यक्रमात सहभागीही होणार आहेत. कोलकात्यात ते तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. बंगळुरूचा दौरा करून धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेणार आहेत. राळेगण सिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीलाही ते लवकरच जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात चंद्रशेखर राव यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. चेन्नईत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना भेटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या मनमानी विरोधात व केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत चंद्रशेखर राव यांच्या भूमिकेला समर्थन दिले होते. मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत काहीच मतप्रदर्शन केलेले नव्हते. कारण चंद्रशेखर राव यांना समर्थन दिल्याने काँग्रेस पक्षाची नाराजी ओढावून घ्यावी लागली असती. शरद पवार यांनी तर चंद्रशेखर राव यांच्याशी राजकीय चर्चा झालीच नाही, असे टवीट केले होते. फक्त राज्याच्या विकासावर चर्चा झाल्याचे पवारांनी स्पष्ट केले होते. म्हणजेच विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या शरद पवार यांनी चंद्रशेखर राव यांना अजिबात महत्त्व दिले नव्हते. ममता बॅनर्जी यांचीही राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. यामुळे ममतादिदीही चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता दिसत नाही.
आम आदमी पार्टीने पंजाबच्या यशानंतर देशभर पाया अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. केजरीवाल हे विविध राज्यांचे दौरै करीत आहेत. काँग्रेस कमकुवत झाल्याने भाजपला समर्थ पर्याय म्हणून आम आदमी पार्टी पुढे येईल या दृष्टीने केजरीवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे केजरीवाल हे सुद्धा चंद्रशेखर राव यांच्या आघाडीत सामील होण्याची शक्यता नाही. आप आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवेल, असे केजरीवाल यांनी आधीच जाहीर केले आहे.