तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या तथा आमदार के कविता याचे दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात नाव आले आहे. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून त्या चर्चेत आहेत. नुकतीच ईडीने त्यांची चौकशी केली आहे. येत्या १६ मार्च रोजी त्यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. एकीकडे चंद्रेशखर राव यांचा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्ष कर्नाटक, महाराष्ट्रात विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. असे असतानाच आगामी कर्नाटक, महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बीआरएसची भूमिका काय असेल? यावर कविता यांनी भाष्य केले आहे.
हेही वाचा >> भाजपाला बिहारमध्ये हवे आहेत नवे सहकारी; केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन नवे सहकारी जोडण्याचा प्रयत्न
कर्नाटकमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तर महाराष्ट्रात २०२४ साली निवडणूक होणार आहे. या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भातील बीआरएसचे नियोजन आणि भूमिकेवर के कविता यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या पक्षाची भूमिका आणि नियोजन तेथील स्थानिक समीकरणांवर अवलंबून असेल. या राज्यांत समविचारी पक्षाचा उमेदवार असेल तर आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असेल. ज्या पक्षांसोबत आमची युती असेल त्या पक्षांना आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ. स्थानिक पक्षांचे काही नेते आमच्याकडे येत असून आम्हाला पाठिंबा मागत आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा पक्ष योग्य निर्णय घेईल,” असे के किवता म्हणाल्या.
हेही वाचा >> जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रात १७ लाख कर्मचारी संपावर, शिंदे-फडणवीस सरकार अडचणीत; विरोधक आक्रमक!
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात करण्यात आलेल्या आऱोपांवरही के कविता यांनी प्रतिक्रिया दिली. “मी एक कणखर स्त्री आहे. मी ईडीला घाबरत नाही. माझ्यावर केवळ आरोप करण्यात आले आहेत. मी काहीही चुकीचे केलेल नाही, त्यामुळे ईडीला घाबरण्याचे कारण नाही. सत्य माझ्या बाजूने आहे. ईडी लोकशाही संपवण्यासाठीचे शस्त्र बनली आहे. या सर्व आरोपांमागे मी नव्हे तर माझे वडील मुख्य लक्ष्य आहेत,” असा आरोप के कविता यांनी केला.
हेही वाचा >>Jalandhar by election : चरणजितसिंह चन्नी यांना झटका, पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून महिला उमेदवार!
“भाजपा पक्ष भाजपाचे राष्ट्रीय सचिव बीएल संथोश, गौतम अदाणी यांच्याविषयी बोलणार नाही. माझ्यावर करण्यात आरोपांचा मी कायदेशीर मार्गाने प्रतिकार करणार आहे. आता ही एका प्रकारे लढाईच झाली आहे, असेही के कविता म्हणाल्या. मी फक्त आमदार आहे. ते फक्त माझ्यावर नव्हे तर बीआरएस पक्षावरही हल्ला करत आहेत. मागील काही वर्षांत भाजपाला तेलंगाणामध्ये जागा मिळालेली नाही. त्यामुळे छापेमारी करून राज्य करण्याचा त्यांचा विचार आहे. भाजपा तेलंगाणामध्ये भाती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र बीआरएस याचा प्रतिकार करणार,” असा विश्वासही के कविता यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >> भाजपा हायकमांड कर्नाटकमधील नेत्यांवर नाराज? मोदींच्या ‘त्या’ कृतीमुळे चर्चेला उधाण!
दरम्यान, त्यांनी महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर मंजूर करायला हवे, अशी मागणी केली. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणे गरजेचे आहे. सध्या भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे. त्यांनी याआधी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. त्यांनी तीन लाक, एनआरसी सारखे विधेयक मंजूर केले. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करणे भाजपासाठी फार मोठी बाब नाही. मात्र भाजपाला या विधेयकात रस नाही, असा आरोप के कविता यांनी केला.