दिल्लीमधील कथित मद्य धोरण घोटाळ्यात नाव आल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या तथा आमदार के कविता चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. एकीकडे चौकशीचा समसेमिरा मागे लागलेला असताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची मागणी करणारे ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर करावे, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी एकदिवसीय उपोषण केले, तसेच त्यांनी या आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची बैठकही आयोजित केली होती. या बैठकीला १२ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा >> रामचरितमानसवरून पुन्हा एकदा JDU-RJD आमनेसामने; जेडीयूचा नेता म्हणाला, “आता कुराण आणि बायबल…”
बैठकीला वेगवेगळ्या १२ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित
राजकारणात महिलांना समान संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक त्वरित मंजूर करावे, अशी मागणी के कविता यांनी केली आहे. त्यांनी दिल्लीमध्ये या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची तसेच सामाजिक संघटनांची बैठक घेतली आहे. या बैठकीला वेगवेगळ्या १२ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याविषयी बोलताना, “साधारण १२ राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी करण्यात आली,” अशी माहिती के कविता यांनी दिली.
हेही वाचा >> मोदी सरकारचा नववा वर्धापन दिन; मोदींची लोकप्रियता आणि विकासकामांच्या जाहिराती केल्या जाणार
१० मार्च रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर उपोषण
के कविता यांच्याकडून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी इतर पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले जात आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारवर दाबाव टाकण्याची गरज आहे, अशीही भूमिका कविता यांनी घेतली आहे. याआधी त्यांनी १० मार्च रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते.
हेही वाचा >> ठाकरे गट फुटत नसल्याने नागपूरमध्ये शिंदे गटाकडून मनसेला खिंडार; नागपूर जिल्हा सचिवाचा पक्षप्रवेश
दरम्यान, के कविता यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दिल्लीतील बैठकीला बीआरएस, जेएमएम, डीएमके, आरजेडी, समाजवादी पार्टी, सीपीआय, शिवसेना, आम आदमी पार्टी, आरएलडी, आरएसपी, सीपीएन, व्हीसीके, चंद्रशेखर आझाद यांची आझाद समाज पार्टी आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच शेतकरी संघटनेचे नेते, महिला संघटनांचे प्रतिनिधी तसेच विद्यार्थीदेखील या बैठकीला उपस्थित होते.