बॉलिवूड आणि दक्षिणेतील सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी काही वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश करत ‘मक्कल निधी मय्यम’ (MNM) या पक्षाची स्थापना केली होती. मात्र २०१९ च्या लोकसभा आणि २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. २७ फेब्रुवारी रोजी देशातील विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. तामिळनाडू मधील पूर्व इरोड या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला आहे. याआधीच्या दोन्ही निवडणुकात स्वबळावर निवडणूक लढविणारे कमल हासन यांचे लक्ष आता युती आणि आघाडीकडे लागले असल्याचे यामधून दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MNM पक्षाची ती मतं निर्णायक ठरणार

कमल हासन डिसेंबर महिन्यात राहुल गांधी सोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर ते काँग्रेसच्या जवळ आल्याचा कयास बांधला जात होता. आता पूर्व इरोडचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार एलंगोवन यांना बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसची मोठी डोकेदुखी दूर झाली आहे. एलंगोवन यांनी यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, कमल हासन यांच्या पाठिंब्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारधारेकडे त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून कमल हासन यांच्या एमएनएम पक्षाने ९००० मते मिळवली होती. ही मते आता काँग्रेसकडे वळती होतील, अशी आशा काँग्रेसला वाटते.

हे वाचा >> तीन अफेअर, दोन लग्नं करूनही ६८ वर्षांचे कमल हासन आजही सिंगल; जाणून घ्या त्यांच्या लव्हलाईफबद्दल

ही पोटनिवडणूक डीएमके आणि काँग्रेसची आघाडी असलेली सेक्यूर प्रोग्रेसिव्ह आघाडी (SPA) यांच्या माध्यमातून लढविली जात आहे. पोटनिवडणुकीसाठी एमएनएमने धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा दिला असला तरी कमल हासन यांनी हा निर्णय सध्याच्या परिस्थितीत घेतला असल्याचे सांगितले. पुढच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची? हे तेव्हाचं तेव्हा ठरवू असेही ते म्हणाले. २०१८ मध्ये जेव्हा कमल हासन यांनी पक्षाची स्थापना केली होती, तेव्हा ते डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIADMK) या पक्षांना पर्याय ठरतील असे बोलले जात होते. पण एमएनएमला फारसे यश मिळू शकले नाही. त्यामुळेच आता आघाडीत सामील होऊन स्वतःच्या पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न कमल हासन करत आहेत.

हे ही वाचा >> “…म्हणून मी ‘हे राम’ हा चित्रपट बनवला” राहुल गांधींबरोबर गप्पा मारताना कमल हासन यांचा खुलासा

द्रमुकच्या एका नेत्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, कमल हासन यांची ही रणनीती काँग्रेसपेक्षा त्यांनाच अधिक फायदेशीर ठरु शकते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर कमल हासन यांना पक्षांतर्गत दबाव सहन करावा लागला होता. त्यांचा पक्ष सर्वच्या सर्व जागांवर पराभूत झाला होता. तसेच कमल हासन यांचा एककल्ली कारभार आणि स्वतःच्या प्रतिमेभोवतीच राजकारण करण्याच्या स्वभावाला कंटाळून अनेक ज्येष्ठ राजकारणी पक्षाला सोडून गेले होते. त्यामुले कमल हासन यांचा आघाडीचा हा प्रयत्न एमएनएम पक्षाला तारणार का? याकडे त्यांचे पक्षाचे लक्ष असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kamal haasan give support to congress candidate in east eorde by election in tamilnadu kvg