नागपूर : भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातून पक्षाने यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश भोयर रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवित असल्याने या मतदारसंघाच्या लढतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि बावनकुळे यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे.
नागपूर शहराला लागून असलेला कामठी मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण असा समिश्र स्वरुपाचा आहे. २००४ पासून येथून सातत्याने भाजप विजयी होत आहे. यंदाच्या निवडणुकीत कामठीतून एकूण १९ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यात होणार आहे. या मतदारसंघात दलित आणि मुस्लीमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मतांवर काँग्रेसची भिस्त आहे. ओबीसी मतदारांवर चंद्रशेखर बावनकुळे यांची पकड आहे. ते या मतदारसंघातून २००४, २००९ व २०१४ असे सलग तीन वेळा विजयी झाले होते.
हेही वाचा >>>आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
विजयाची हॅट््िट्रक करूनही त्यांना पक्षाने २०१९ मध्ये अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारली होती. त्यांच्याऐवजी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिली होती. सावरकर ११ हजार १३६ मतांनीच विजयी झाले होते. २०१४ च्या मताधिक्याच्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपचे मताधिक्य ७० टक्क्यांहून अधिक घटले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही महायुतीला या मतदारसंघातून कमी मते मिळाल्याने भाजपने सावरकर यांच्याऐवजी पुन्हा बावनकुळे यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काँग्रेसकडून पुन्हा सुरेश भोयर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पूर्व नागपुरात राष्ट्रवादीसमोर अडचणींचा डोंगर
२०१९ च्या तुलनेत कामठी मतदारसंघाचे एकूण राजकारण बदलले आहे. सुरेश भोयर यांनी लोकसभा निवणुकीत या भागातून काँग्रेसला मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते व त्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे भोयर यांच्या पाठीशी काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. लोकसभा निवडणुकीत कामठीमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा सुमारे १८ हजार मते अधिक मिळाली होती. यामुळेच बावनकुळे यांना सर्व समाजांना बरोबर घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
निर्णायक मुद्दे
● मतदारसंघात मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या असून १९ पैकी सहा उमेदवार या समाजाचे आहेत. त्यामुळे मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
● बावनकुळे यांनी पालकमंत्री म्हणून मतदारसंघाचा केलेला विकास आणि लोकांशी असलेला त्यांचा थेट संपर्क त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.
● भाजपने त्यांच्या प्रचारात राज्यातील विविध योजना केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. तर बेरोजगारी, उद्याोगांचा अभाव हे महाविकास आघाडीचे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.
लोकसभेतील राजकीय चित्र
महाविकास आघाडी : १,३६,३४२
महायुती : १,१८,८०८