रिषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सप्टेंबर महिन्यात हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला होता. नंतर तो हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला. हिंदीमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले. प्रेक्षकांपासून चित्रपट समीक्षकांपर्यंत अनेक दिग्गजांना या चित्रपटाने भुरळ घातली. कर्नाटकमधील भाजपाचे मंत्री डॉ सी. एन. अश्वथनारायण यांच्याशी संबंधित असलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कौतूक केलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, “माझ्या सहकाऱ्यांबरोबर बंगळुरु येथे ‘कांतारा’ हा चित्रपट पाहिला. रिषभ शेट्टी यांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय उत्कृष्ट आहे. या चित्रपटात समृद्ध असलेल्या तुळुवनाडू आणि करावली या परंपरांचे उत्तम चित्रण केले आहे.”
तर, २ नोव्हेंबरला जागतिक संमेलनाचे उद्घाटन झाले. यामध्ये बोलताना पीयूष गोयल सांगितलं की, “१५ कोटी रुपयांचे बजेट असलेल्या चित्रपटाने २० पटीने कमाई केली. ‘कांतारा’ हा कमी बजेटचा चित्रपट कर्नाटकची संस्कृती दर्शवतो. यामुळे गुंतवणूकदार आणि उद्योग भारत आणि प्रगतशील धोरणे राबवणाऱ्या राज्यांकडे आकर्षित झाले आहेत,” असे पीयूष गोयल यांनी म्हटलं.
‘कांतारा’ आणि ‘केजीएफ’ या चित्रपटांची निर्मिती विजय टी किरगांडूर यांच्या ‘होंबळे फिल्म एलएलपी या प्रॉडक्शन हाऊस’ने केली आहे. किरगांडूर हे कर्नाटकचे मंत्री अश्वथनारायण यांचे चुलत भाऊ आहे. अश्वथनारायण हे कर्नाटकचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत. २०१९ ते २०२१ या कार्यकाळात ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही होते. अश्वथनारायण यांनी किरगांडून यांच्या अनेक उपक्रमांत गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. होंबळे फिल्म्सने बनवलेल्या सालार ते केजीएफ सारख्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये अश्वथनारायण सहभागी झालेले दिसले आहे. त्यामुळे अश्वथनारायण यांचा ‘कांतारा’ आणि ‘केजीएफ’ चित्रपटाशी संबंध कसा येतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या जिग्नेश मेवानींच्या विरोधात तगड्या उमेदवारांचे आव्हान; वडगाममध्ये तिरंगी लढत?
किरगांडूर यांच्यासाठी अश्वथनारायण हमीदार
मिळालेल्या माहितीनुसार, विजय किरगांडूर यांच्या होंबळे फिल्म ( २०१७ निर्मिती ), होंबळे इन्फ्रास्ट्रक्चर ( २०११ ) आणि होंबळे कंट्रक्शन आणि इस्टेट ( २०१६ ) अशा कंपन्या आहेत. होंबळे कंट्रक्शन आणि इस्टेट कंपनीत चालुवे गौडा हे सुद्धा संचालक आहे. गौडा हे ‘कांतारा’च्या निर्मात्यांपैकी एक आहेत. तर, अश्वथनारायण यांनी २०१२ साली सुरु केलेल्या मल्लेश्वरम स्पोर्ट फाऊंडेशचे किरगांडूर हे संचालक आहेत. तसेच, अश्वथनारायण हे किरगांडूर यांनी काढलेल्या अनेक बँक कर्जासाठी हमीदार देखील राहिले आहेत.
भाजपाचे सरकार असताना उत्पनात वाढ
विजय किरगांडूर यांनी होंबळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर विजया बँकेकडून २०१२ साली १५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तर, होंबळे कन्स्ट्रक्शन्ससाठी २०१८ साली विजया बँकेकडून १७५ कोटींचे कर्ज घेण्यात आले. या दोन्हीसाठी अश्वथनारायण हमीदार राहिले होते. यात महत्वाचं म्हणजे कर्नाटकमध्ये २००८ ते २०१३ भाजपाचे सरकार असताना होंबळे इन्फ्रास्ट्रक्चरचे उत्पन्न कमाई ६४ लाख रुपये होते. ते २०१२-१३ मध्ये ४२ कोटी रुपये झाले. २०१३ मध्ये ४९ कोटी रुपये तर २०१४-१५ साली १४ कोटींवरून ते ९२ कोटींवर गेले. त्यानंतर उत्पनाच्या रक्कम नोंद करण्यात आली नाही.
हेही वाचा : साताऱ्यात दोन्ही राजांनी एकत्र येण्याची भाजपची सूचना; पालिका निवडणूक पक्षचिन्हावर लढविण्यास पक्ष ठाम
‘केजीएफ’-‘कांतारा’ने मोडले कमाईचे रेकॉर्ड
होंबळे फिल्मचा २०१८ ‘केजीएफ’च्या पहिला भाग प्रदर्शित झाल्यावर त्याने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. १०० कोटींचा टप्पा पार करणारा ‘केजीएफ’ हा कर्नाटकातील पहिला चित्रपट होता. तर, ‘केजएफ’च्या दुसऱ्या भागाने १००० कोटी रुपयांची कमाई केल्याची नोंद आहे. ‘कांतारा’ चित्रपटानेही मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे.
होंबळे कन्स्ट्रक्शन्सचं ४०८ कोटींचे सर्वोच्च उत्पन्न
होंबळे फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ साली कंपनीचे उत्पन्न ३६.४३ लाख रुपये होते. २०१८-१९ मध्ये त्याच्यात वाढ होऊन ५८ कोटी रुपये झाले. त्यानंतर २०१९-२० साली १.२१ कोटी आणि २०२०-२१ मध्ये २.५९ कोटी रुपयांपर्यंत कमी झाले. तर, होंबळे कन्स्ट्रक्शन्सने २०१९-२० मध्ये सर्वाधिक ४०८ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. २०२१-२२ मध्ये ३२२ कोटी रुपये उत्पन्न होते. त्यामुळे २०१९ साली किरगांडूर यांचे उत्पन्न आयकर विभागाच्या चौकशीचा विषय होता.
अश्वथनारायण यांची केवळ २१ कोटींची संपत्ती
यातून एक स्पष्ट होतं की, होंबळे फिल्म्स आणि होंबळे कन्स्ट्रक्शन्सने अलिकडच्या काही वर्षात यशस्वी कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत होंबळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या उत्पनाची कोणतीही नोंद करण्यात आली नाही. तर, अश्वथनारायण यांनी स्वत: २००८ मध्ये ५ कोटी, २०१३ साली १५ कोटी रुपये आणि २०१८ मध्ये २१ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं निवडणूक शपथपत्रात दाखल केलं होतं.