लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवारी रात्री पाचवी यादी जाहीर केली. या यादीत अभिनेत्री कंगना रणौतचेही नाव आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने कंगना राणौतला उमेदवारी दिली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह आहेत. खरं तर कंगना राणौतच्या राजकीय पदार्पणाची सुरुवात एका वादातून झाली होती. कंगनाला उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. यानंतर राजकीय तणाव वाढला होता. कंगना राणौतचा फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, बाजारात (मंडी) किंमत काय आहे हे कोणी सांगू शकेल का? ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भाजपाने श्रीनेट आणि काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. कंगना हिमाचलमधील मंडी येथून भाजपाची लोकसभा उमेदवार आहे. त्यानंतर सुप्रिया श्रीनेट यांनी त्यांच्या अकाऊंट हॅक झाल्याचं सांगितलं.
मोदींनी राबवलेल्या प्रकल्पांच्या निवडीवरूनही तिचा भाजपाकडे झुकता कल
खरं तर ३७ वर्षी कंगना राणौत हिला या वादाचा राजकीय फायदा कसा करून घ्यायचा बहुदा हे समजले नसावे, नाही तर ती तिच्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीलाच केंद्रस्थानी आली असती. गेल्या काही काळापासून रणौतने फक्त तिच्या सार्वजनिक टिप्पण्या आणि पोस्ट्समधूनच नव्हे, तर मोदींनी राबवलेल्या प्रकल्पांच्या निवडीवरूनही तिचा भाजपाकडे झुकता कल दिसून येतो. बॉलीवूड उद्योगाने तिच्याकडे पाठ फिरवली आणि म्हणून तिने राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे ती आता चित्रपट सृष्टीला पर्याय म्हणून राजकारणाकडे पाहू लागली आहे.
हेही वाचाः दिलीप घोष यांच्या ममतांवरील टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव
पक्षासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे बक्षीस म्हणून तिकीट देणार असल्याची चर्चा
खरं तर कंगनाला भाजपा तिने आजपर्यंत पक्षासाठी घेतलेल्या भूमिकेमुळे बक्षीस म्हणून तिकीट देणार असल्याची चर्चा होती. मंडी हा कंगनाचा बालेकिल्ला असल्याचंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे कंगनासाठी तोच सर्वोत्तम पर्याय आहे. ती जागा सध्या काँग्रेसच्या हिमाचल प्रदेशच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांच्याकडे आहे. कंगना रणौतला उमेदवारी देण्यासाठी हिमाचलच्या काही भागातून भाजपा कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता. परंतु कंगना हिमाचलच्या विविध समुदायांचे प्रतिनिधित्व करू शकते, असा विश्वास भाजपा नेतृत्वाला आहे. त्यामुळेच तिला तिकीट दिल्याचं भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.
मंडी जिल्ह्यातील भांबला येथूनच १६ वर्षीय कंगना रणौतने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जात अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडले. त्यानंतर तिने एकाहून एक चांगले चित्रपट केले. तिचा पहिला चित्रपट गँगस्टर (२००६) मध्ये हिट ठरला आणि तिचे यश झपाट्याने वाढले, त्यानंतर फॅशनमधील सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार (२००८)ही मिळाला. क्वीन (२०१४), तनु वेड्स मनु रिटर्न्स (२०१५), मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) आणि पंगा (२०२०) या राष्ट्रीय चित्रपटातही तिनं आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. २०२१ मध्ये राणौतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हृतिक रोशनबरोबर सार्वजनिकरीत्या झालेल्या वादानंतर बॉलिवूडने तिच्याकडे काहीशी पाठ फिरवली
कंगनाच्या उच्चाराबद्दल सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये कुजबूज होती. आदित्य पांचोली आणि अध्ययन सुमन यांच्या बरोबर असलेल्या कथित संबंधांमुळे तिला काही काळ बॉलिवूडच्या एका गटाकडून नाराजीचा सामना करावा लागला. तसेच हृतिक रोशनबरोबर सार्वजनिकरीत्या झालेल्या वादानंतर बॉलिवूडने तिच्याकडे काहीशी पाठ फिरवली. काही जणांनी तिच्या या कृत्याकडे प्रसिद्धी झोतात येण्याचे माध्यम म्हणून पाहिले. ज्यात ती एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीच असे वाद निर्माण करत असल्याचं बोललं जात होतं. २०१७ मध्ये करण जोहरच्या कार्यक्रमात तिने नेपोटिझम आणि चित्रपट माफियांविरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यामुळेही ती तेव्हा चर्चेत आली होती. त्यानंतरही कायम ती वादात सापडत गेली. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी तिच्याबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला. रनौतने न्यूयॉर्क फिल्म स्कूलमध्ये स्क्रिप्ट रायटिंग कोर्सदेखील केला होता. बॉलिवूडमध्ये ती अधिकाधिक एकाकी पडू लागली, तेव्हाच राणौत भाजपाकडे वळू लागली. त्यानंतर तिने राष्ट्रभक्तीपर चित्रपट करण्यावर भर दिला. मणिकर्णिका, धाकड आणि तेजस यांसारखे चित्रपट राष्ट्रवाद आणि देशभक्तीभोवती केंद्रित राहिले. खरं तर ते बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले तरीही कंगनाला भाजपाच्या जवळ जाण्याचे एक निमित्त मिळालं. धाकड अपयशी ठरल्यानंतर बॉलिवूडमध्ये तिच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचाही तिने आरोप केला. हिमाचलमधील मंदिरांना भेट दिल्याचे फोटो पोस्ट करून तिने एका धर्माभिमानी हिंदूची प्रतिमा उंचावली. तिला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठीही निमंत्रित करण्यात आले होते. जय श्री रामचा जयघोष करतच तिने मंदिरातही प्रवेश केला होता. सोशल मीडियावरही तिने भाजपा समर्थक यांचे ट्विट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या तब्येतीची विचारपूस करणारीही पोस्ट केली होती. जग्गी वासुदेव हे भाजपाच्या जवळचे मानले जातात आणि ज्यांच्यावर अलीकडेच मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून कंगनाने २१ वर्षांत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंडी सोडल्यानंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचे स्वप्न तिने पूर्ण केले आणि ती तिच्या राजकारणातील नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. खरं तर तिची महत्त्वाकांक्षा वाखाणण्याजोगी आहे. कंगनाने ती एका छोट्याशा खेडेगावात वाढल्याचंही अनेकदा सांगितलं आहे. तसेच तिने स्वतःमधील कंगनाला कधी ओळखले याबद्दलही ती बऱ्याचदा बोलली आहे.