Karnataka Assembly Election 2023 : पुढील महिन्यात १० मे रोजी कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे कर्नाटकात राजकीय शिमगा सुरू आहे. सत्ताधारी भाजपापुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठीच केंद्रापासून ते राज्य सरकारपर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यातच बुधवारी (५ एप्रिल) कन्नड अभिनेता, सुपरस्टार किच्चा सुदीप याच्यासोबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, किच्चा सुदीप हे कदाचित निवडणुकीत उतरतील किंवा निवडणुकीसाठी भाजपाचा प्रचार करतील. पत्रकार परिषदेनंतर किच्चा सुदीप यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर हॅशटॅग चालवून सुदीप यांनी राजकारणात उतरू नये, अशी विनंती केली. यामुळे मुख्यमंत्री बोम्मई यांना पुन्हा सारवासारव करून सुदीप माझे मित्र असून माझ्यासाठी ते फक्त भाजपाचा प्रचार करणार, असे स्पष्ट करावे लागले.
अभिनेते किच्चा सुदीप यांचे कर्नाटकातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. १७ फेब्रुवारी रोजीच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांची भेट घेऊन राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची चाचपणी केली होती. मात्र त्यानंतर राजकारणात उतरण्याचा दावा सुदीप यांनी फेटाळून लावला. “अशा प्रकारचा निर्णय घेण्याआधी मला अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या चाहत्यांना याबाबत काय वाटते? हे पाहणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.” माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना किच्चा सुदीप यांनी सांगितले की, माझे डीके शिवकुमार, मुख्यमंत्री बोम्मई आणि कॅबिनेट मंत्री डीके सुधाकर यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच इतर नेत्यांसोबत माझा चांगला संपर्क आहे. पण राजकारणात जाण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. जेव्हा असा निर्णय घेण्याची वेळ येईल, तेव्हा मी ते जाहीरपणे सांगेल.
दरम्यान, किच्चा सुदीप यांनी २०२० मध्ये भाजपा आमदार मुनिरत्ना यांच्यासाठी ‘राजा राजेश्वरी नगर’ या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रचार केला होता. शिवमोगा जिल्ह्याचे रहिवासी, ४९ वर्षीय किच्चा सुदीप हे अनुसूचित जमातीमधील वाल्मीकी नायका या समुदायातून येतात. किच्चा सुदीप यांना प्रचारात घेतल्यामुळे राज्यातील अनुसूचित जमाती भाजपापासून लांब राहू नये, अशीही एक खेळी असल्याचे सांगण्यात येते.
केंद्रीय यंत्रणेच्या दबावाखाली निर्णय?
किच्चा सुदीप यांचा निर्णय केंद्रीय यंत्रणेच्या दबावामुळे झाला असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. २०१९ साली अनेक अभिनेते, निर्माते यांच्यावर प्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्या होत्या. त्यामध्ये किच्चा सुदीप यांचेही नाव होते. अभिनेते किच्चा सुदीप यांच्या निर्णयाबद्दल बोलताना काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सूरजेवाला म्हणाले, “अभिनेत्याने कुणाला पाठिंबा द्यावा, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे किंवा कधी कधी आयटी आणि ईडी यांना घाबरूनही निर्णय घेतला जातो. कर्नाटक भाजपा आता लयास गेल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री बोम्मई आणि भाजपाच्या नेत्यांचे कुणीही ऐकत नसल्यामुळे त्यांना आता गर्दी जमविण्यासाठी अभिनेत्यांना सोबत घ्यावे लागत आहे. पण कर्नाटकचे भविष्य अभिनेता नाही, तर लोकच ठरवतील.”
जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, किच्चा सुदीप यांनी भाजपाला पाठिंबा दिलेला नाही. ते फक्त बोम्मई यांच्या मैत्रीखातर प्रचारात उतरणार आहेत.
कोण आहेत किच्चा सुदीप?
किच्चा सुदीप यांनी नुकतेच कन्नड सिनेसृष्टीतील कारकिर्दीची २७ वर्षं पूर्ण केली. कर्नाटकमधील लोकप्रिय कलाकारांपैकी ते एक आहेत. २००० साली प्रदर्शित झालेल्या हुच्छा (Huchcha) या चित्रपटाने त्यांना राज्यभर ओळख मिळाली. तामिळमधील अभिनेते विक्रम यांच्या सेथू चित्रपटाचा हा रिमेक होता. (सलमान खानचा ‘तेरे नाम’देखील याच चित्रपटाचा रिमेक होता) त्यासोबतच धुम (Dhumm), नंधी (Nandhi), किच्चा (Kiccha), रंगा (Ranga), जस्ट माथ मथाली (Just Maath Maathalli), केम्पे गौडा (Kempe Gowda), विष्णुवर्धना (Vishnuvardhana) अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. २००६ साली त्यांनी माय ऑटोग्राफ (My Autograph) या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. तसेच त्यांनी पटकथा लेखक आणि गायक म्हणूनही काम केले आहे.
कन्नड चित्रपटांसोबतच किच्चा सुदीप यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे. राम गोपाल वर्मा यांच्या फूंक (Phoonk 2008) या चित्रपटापासून त्यांनी हिंदी भाषेत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिषेक बच्चन व सलमान खान यांच्यासोबत अनुक्रमे ‘रन’ आणि ‘दबंग-३’ मध्ये काम केले. त्यासोबतच दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर ऐगामध्येही त्यांनी काम केले होते. नुकतेच त्यांच्या विक्रम रोना आणि कब्जा या दोन चित्रपटांचे प्रदर्शन झालेले आहे. तसेच कन्नड बिग बॉससोबत ते २०१३ पासून जोडलेले आहेत.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही – किच्चा सुदीप
किच्चा सुदीप मागच्या वर्षी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला होता. ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही’, असे ट्वीट केल्यानंतर किच्चा सुदीप यांच्यावर जोरदार टीका झाली होती. या ट्वीटला बॉलीवूड अभिनेते अजय देवगण यांनी उत्तर दिले होते. “हिंदी ही राष्ट्रभाषा होती आणि राहील”, असे प्रत्युत्तरादाखल ट्वीट केल्यानंतर अजय देवगण यांना उत्तर भारतातून चांगलाच पाठिंबा मिळाला होता. अजय देवगण यांच्या ट्वीटला किच्चा सुदीपने वेगळ्या भाषेत थेट नाव न घेता उत्तर दिले. त्याने लिहिले, “तुम्ही हिंदी भाषेत लिहिलेला मजकूर मला समजला. कारण आम्ही सर्वच हिंदी शिकत असताना त्या भाषेचा आदर राखतो आणि प्रेम करतो. पण हेच जर मी कन्नड भाषेत लिहिले असते तर माझ्या प्रतिक्रियेवर काय परिस्थिती उद्भवली असती?”
किच्चा सुदीप यांचा व्हिडीओ लिक करण्याची धमकी
किच्चा सुदीप यांनी बुधवारी अचानक राजकीय आखाड्यात उडी घेण्यामागे त्यांना आलेल्या धमकीचा संबंध लावला गेला. नुकतेच एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांचा खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सुदीप यांच्या चाहत्यांनी ट्विटरवर #WedontwantKichchainpolitics हा हॅशटॅग ट्रेंड करून सुदीपने राजकारणापासून लांब राहून चित्रपटातच काम करणे सुरू ठेवावे, अशी विनंती चाहत्यांनी केली.
मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत सुदीप यांनी सांगितले, “बोम्मई यांना मी फार वर्षांपासून ओळखतो आहे. मी लहान असताना त्यांना मामा म्हणून हाक मारत होते. माझ्या संघर्षाच्या काळात मला साथ देणाऱ्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेमाखातर मी प्रचारात उतरत आहे. बोम्मई आज राज्याचे प्रमुख नेते आहेत, याचाही मला आनंद वाटतो. मी माझ्या मामाला पाठिंबा देतोय, हे जाहीर करतो. मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन.” तर याच पत्रकार परिषदेत बोम्मई म्हणाले, माझ्या आणि सुदीपच्या मैत्रीचा आदर करावा. ते काही भाजपात प्रवेश करीत नाहीत. ते फक्त आमच्यासाठी प्रचार करणार आहेत. मी त्यांना पक्षात सामील न होता, आमच्यासाठी प्रचार करावा, अशी विनंती केली होती. त्याचा मान राखून ते प्रचारासाठी तयार झाले, याचा मनापासून आनंद वाटतो