मागील काही दिवसांपासून न्यायपालिका आणि केंद्र सरकार यांच्यात न्यायवृंद, न्यायाधीश नियुक्त्यांच्या मंजुरीवरून वाद सुरू आहे. या वादावर बोलताना केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजिजू यांनी केलेल्या काही विधानांचीही चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान, एकीकडे या वादामुळे विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात असतानाच केंद्र सरकार आणि न्यायपालिकेत कोणताही वाद नाही. चर्चा आणि विचारमंथन होत नसेल तर मग त्याला लोकशाही म्हणावे का? अस मत रिजिजू यांनी नोंदवले आहे. याच विधानाचा वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी समाचार घेतला आहे.
हेही वाचा >>> Uttar Pradesh BJP : आगामी निवडणुकांसाठी उत्तर प्रदेश भाजपाने कसली कंबर; ‘गुजरात मॉडेल’द्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार!
किरेन रिजिजू नेमकं काय म्हणाले?
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात किरेन रिजिजू बोलत होते. यावेळी बोलताना मोदी सरकारने न्यायपालिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केलेला नाही, असा दावा त्यांनी केला. “न्यायपालिका आणि सरकार यांच्यात मतभेद असू शकतात. मात्र मतभेद असले म्हणजे हे दोघेही एकमेकांवर हल्ला करत आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. सध्या सरकार आणि न्यायपालिका यांच्यात वाद असल्याचे काही जणांकडून भासविले जात असले तरी, आमच्यात तसा काही संघर्ष नाही. तसे कोणतेही ‘महाभारत’ घडलेले नाही. जर चर्चा आणि विचारमंथन नसेल, तर मग त्याला लोकशाही कसे म्हणायचे?” असे किरेन रिजिजू म्हणाले.
हेही वाचा >>> “लष्कराला पुरावे देण्याची गरज नाही”, राहुल गांधींचा दिग्विजय सिंहांना घरचा आहेर; म्हणाले, “सर्जिकल स्ट्राईकबाबत…”
कपिल सिबल यांची खरपूस शब्दांत टीका
रिजिजू यांच्या सरकार आणि न्यायपालिकेत कोणताही वाद नाही, या विधानानंतर कपिल सिबल यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. “किरेन रिजिजू म्हणत आहेत की, मोदी सरकारने न्यायपालिकेला कमकुवत करण्यासाठी एकही पाऊल उचललेले नाही. मग तुम्ही आतापर्यंत केलेली वादग्रस्त विधाने न्यायपालिकेला बळकट करण्यासाठी होती का. तुम्हाला यावर विश्वास असेल. मात्र वकील म्हणून आम्हाला ते मान्य नाही,” अशी खोचक टीका कपिल सिबल यांनी केली आहे.