Jayant Patil Islampur Assembly Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा इस्लामपूरचा गड काबीज करण्यासाठी भाजपने मोर्चेबंधणी सुरू केली आहे. मात्र गेली तीन दशके या मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या पाटील यांना नमवण्यासाठी पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाळवा तालुका हा आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. वाळव्यासह शिराळा मतदारसंघात त्यांचे राजकीय वर्चस्व कायम राहिले आहे. या ताकदीवरच त्यांनी सांगली जिल्ह्याचे नेतृत्व मिळविण्याचा कायम प्रयत्न केला. सांगली महापालिकेतही सत्ताबदल घडवून आपली राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घरच्या मैदानात आपल्या विश्वासू शिलेदारांवर जबाबदारी सोपवून ते राज्य पातळीवर पक्षाची प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेतून बांधणी करत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर पाटील यांची कोंडी करण्यासाठी त्यांचे विरोधक कायमच संधीच्या शोधात राहिले आहेत.

हेही वाचा >>> पुणे, सांगलीलाच प्राधान्य; पश्चिम महाराष्ट्रातील भाजपमध्ये खदखद

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये आमदार पाटील यांच्या उमेदवाराचा पाडाव करून निशिकांतदादा भोसले-पाटील हे विजयी झाले. मात्र, यासाठी आमदार पाटील विरोधकांची ताकद आघाडीच्या माध्यमातून एकत्र झाली होती. यामध्ये आमदार सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, महाडिक बंधू यांच्यासह राष्ट्रवादी वगळून सर्वच पक्षाचे नेते एकत्र आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी हा विरोधकांचा एकसंधपणा टिकला नाही. जागा वाटपामध्ये इस्लामपूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने सेनेने गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली तर भोसले-पाटील अपक्ष मैदानात उतरले. त्यांना या निवडणुकीत ४३ हजार ३९४, तर शिवसेनेच्यावतीने मैदानात उतरलेल्या नायकवडींना ३५ हजार ६६८ मते मिळाली होती. यावेळी जयंत पाटील १ लाख १५ हजार ५६३ मते घेऊन विजयी झाले.

हेही वाचा >>> आता तुम्हीच लक्ष द्या साहेब! काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची व्यथा

आमदार पाटील आणि विरोधी मतातील फरक ३२ हजार ३०७ मतांचा राहिला. त्यामुळे विरोधकांचे ऐक्य नसल्यास जयंत पाटील यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकही सोपी ठरण्याची शक्यता आहे. आमदार पाटील यांचा इस्लामपूर गड काबीज करण्यासाठी विरोधकांचे बुरूज सांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा विधान परिषदेवर आमदार म्हणून भाजपने संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात प्रवेश करताना प्रथम इस्लामपूर येथे भेट देऊन कार्यालय सुरू केले. यातून त्यांचीही दिशा स्पष्ट होते. आता शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी यांची मोट बांधण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात असलेली विरोधकांची ताकद जर कमी करायची असेल तर सगळ्यात अगोदर इस्लामपूरचा आमदार पाटलांचा बालेकिल्ला सर करण्याची गरज ओळखून त्या दृष्टीने भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan rajkaran islampur assembly constituency bjp planning to capture ncp jayant patil dominate islampur print politics news zws