लातूर : जिल्ह्यातील निलंगा विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी बांधलेला. आता हा मतदारसंघ भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या ताब्यात असणारा. ते या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले. काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अमित देशमुख यांचे ते कट्टर विरोधक, अशी त्यांची प्रतिमा. लोकसभा निवडणुकीत अमित देशमुखांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना वीस हजार मतांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर यांना घेरण्याची व्यूहरचना आखली आहे.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी आजोबा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा २००४ मध्ये पराभव केला. २००९मध्ये आजोबांनी नातवाचा पराभव केला. त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिवाजीराव निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर हे मैदानात होते. दोन्ही वेळा ते पराभूत झाले. निलंगा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळते. यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला २० हजारांचे मताधिक्य मिळाल्यामुळे निलंगा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा उत्साह वाढला आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पारंपरिक मैदानात असणारे अशोक पाटील निलंगेकर यांच्याशिवाय अभय साळुंखे व डॉक्टर अरविंद भातंब्रे या तिघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
मराठवाड्याचे नेते अमित देशमुख यांनी तिघांनाही तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तिघेही मतदारसंघात संपर्क वाढवत आहेत. नेमके कोणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. संभाजी पाटील निलंगेकर हे लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्यामुळे ते सावध पवित्रा घेऊन विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत.
मतदारसंघातील सर्व मंडळात ते व्यक्तिगत जाऊन येत असून त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर आई माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर असे सगळे कुटुंबच आतापासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. संभाजी पाटील निलंगेकर यांना चौथ्यांदा विजयी करायचे असा चंग त्यांनी बांधला आहे.
हेही वाचा : Champai Soren : झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का? माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपाच्या वाटेवर?
● संभाजी पाटील निलंगेकर यांना पराभूत करण्यासाठी अमित देशमुख यांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे.
● ‘जरांगे प्रारुपाचा प्रभाव’, मुस्लीम समाजाचे ऐक्य व महायुती सरकार बद्दलची नाराजी याचा लाभ महाविकास आघाडीला होईल असा देशमुख यांचा होरा आहे.
● तीन संभाव्य उमेदवारांना समोर ठेवून काँग्रेसने आखणी सुरू केल्याने संभाजी पाटील यांना तीन आघाड्यांवर लढावे लागणार आहे.
● निलंगा मतदार संघात असलेला संपर्क गेल्या तीन टर्म मध्ये केलेली विकास कामे या जोरावर पुन्हा चौथ्यांदा निवडून येण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर यांना कसरत करावी लागणार आहे.