Jayakumar Rawal in Sindkheda Assembly Constituency : विरोधकांनी कितीही रान उठवले तरी तीन विधानसभा निवडणुकांपासून शिंदखेडा मतदारसंघावर प्रभाव कायम ठेवण्यात यशस्वी झालेले भाजपचे जयकुमार रावल यांच्यासाठी आगामी निवडणूक बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आव्हानात्मक झाली आहे. रावल यांचे विश्वासू साथीदार कामराज निकम यांनी सोडलेली साथ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते ज्ञानेश्वर भामरे यांच्याशी निर्माण झालेले वैर, ही दोन प्रमुख कारणे रावल यांच्या राजकीय चातुर्याची परीक्षा पाहणारी ठरणार आहेत.
घरातूनच राजकारणाचे मिळालेले बाळकडू, खान्देशातील स्वत:च्या उद्याोगाची भरभक्कम साथ, वडिलोपार्जित मालमत्ता आणि पारंपरिक राजघराण्याचा वारसा, असे सर्वकाही पाठीशी असल्याने मतदारसंघात राजकीय बस्तान बसविणे रावल यांना फारसे अवघड गेले नाही. २००४ मध्ये तत्कालीन शहादा मतदारसंघातून रावल हे भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले. यानंतर प्रत्येक निवडणुकीत रावल यांना विजय मिळत गेला. २००९ मध्ये पुनर्रचनेत निर्माण झालेल्या शिंदखेडा मतदारसंघातून बाजी मारताना त्यांनी काँग्रेसचे शामकांत सनेर यांच्याविरुद्ध ५० हजार ६९९ चे मताधिक्य घेतले. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा रावल यांनी ४२ हजार १५८ मताधिक्य घेत पराभव केला. २००९च्या तुलनेत मताधिक्य घटले असले, तरी २०१९ मध्ये रावल यांनी पुन्हा बेडसे यांच्यावर ४२ हजार ९१५ च्या मताधिक्यासह विजय मिळवला.
हेही वाचा : पदावर असताना मृत्यू पावलेले नांदेडमधील सातवे लोकप्रतिनिधी !
युती सत्तेत असताना रावल यांनी पर्यटन खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. मंत्रीपदामुळे रावल यांचा राजकीय दबदबा अधिकच वाढला. मंत्रिमंडळात मिळालेले स्थान आणि भाजपच्या राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी जवळीक याचा त्यांनी जिल्ह्यातील राजकारणात पुरेपूर उपयोग करून घेतला. विरोधक आपल्याविरोधात एकत्र येणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. माजी मंत्री हेमंत देशमुख, त्यांचे बंधू रवींद्र देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर भामरे, अॅड. एकनाथ भावसार या नेत्यांना रावल यांनी विशेष लक्ष्य केले.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेली फूट, काँग्रेसचा वाढलेला प्रभाव आणि महायुती असतानाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धुळे मतदारसंघात पत्करावा लागलेला पराभव, रावल यांना त्रासदायक ठरावेत असे हे घटक आहेत. परंतु दुरावलेले कामराज निकम आणि वृद्धापकाळात डॉ. देशमुख यांच्यावर दाखल झालेल्या बाललैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे डॉ. देशमुख यांच्याविषयी आपोआपच निर्माण झालेली सहानुभूती, हे विषय रावल यांच्यासाठी अधिक चिंतनीय झाले आहेत.
उमेदवारीसाठी स्पर्धा
शिंदखेडा मतदारसंघातून महायुतीतर्फे विद्यामान आमदार जयकुमार रावल (भाजप), ज्ञानेश्वर भामरे (राष्ट्रवादी अजित पवार गट), तर महाविकास आघाडीकडून कामराज निकम आणि संदीप बेडसे (दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार गट), शामकांत सनेर (काँग्रेस), हेमंत साळुंखे (ठाकरे गट) हे इच्छुक आहेत.