Digras Assembly Election 2024यवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असले तरी दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबत सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पूजा चव्हाण प्रकरणात राठोड यांच्या विरुद्ध आंदोलन करणारा भाजप आगामी निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून राठोड यांचा प्रचार करणार का हे पाहणेही औत्युक्याचे ठरणार आहे.
२००४ मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवून संजय राठोड यांनी दारव्हा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत दारव्हा बाद होऊन दिग्रस मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेकडून राठोड विजयी होत आहेत. दिग्रस मतदारसंघात समाविष्ट दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यांत शिवसेनेचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले. २०१४ मध्ये संजय राठोड पहिल्यांदा राज्यमंत्री झाले. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट झाले. २०२१ मध्ये त्यांच्यावर पूजा चव्हाण नामक तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात आरोप झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. हा मुद्दा तेव्हा भाजपने जोरकसपणे लावून धरला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यामुळे भाजपने आरोप केलेले राठोड बरोबर सत्तेत बसल्याने भाजपची गोची झाली.
हेही वाचा : Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली? काय आहे राजकीय गणित?
● लोकसभा निवडणुकीत दिग्रसमधून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना आठ हजारांचे मताधिक्य मिळाले. यामुळे दिग्रसमधून विधानसभा निवडणुकीत चित्र नेमके कसे राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
● महायुतीकडून शिंदे गटाचे संजय राठोड हेच उमेदवार असतील हे अंतिम आहे. मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उभे करायचे याची चाचपणी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे पक्ष करत आहेत.
● लोकसभा निवडणुकीतील यशामुळे ठाकरे गटाने या मतदारसंघावर हक्क सांगितला आहे, तर पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला असल्याने काँग्रेसही हक्क सोडायला तयार नाही.
● विद्यमान खासदार संजय देशमुख हे आपल्या निकटवर्तीयासाठी येथे मोर्चेबांधणी करीत आहे, तर काँग्रेसकडून पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. याशिवाय काँग्रेस बंजारा समाजातील पर्याय शोधत आहे.