केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नुकतंच कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी मंड्या येथील नंदिनी डेअरीला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशन संचलित नंदिनी डेअरी आणि गुजरातमधील अमूल या दोन संस्थांचं विलीनीकरण करण्याबाबत विधान केलं आहे. अमित शाह यांच्या विधानावर विरोधी पक्ष, नेटकरी आणि शेतकरी नेत्यांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला.
हा वाद सुरू असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. कर्नाटकमधील लोकप्रिय ब्रॅंड नंदिनी डेअरची वेगळी ओळख आहे, याचं अमूलमध्ये विलीनीकरण होणार नाही, अशी माहिती बोम्मईंनी दिली. तसेच गुजरातमधील अमूल डेअरी आणि कर्नाटकमधील नंदिनी डेअरी या दोन संस्थांचं विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असंही बोम्मई म्हणाले.
कर्नाटक मिल्क फेडरेशन हे कर्नाटक सहकार विभागाची एक संस्था आहे. या संस्थेकडून ‘नंदिनी’ या ब्रँडच्या नावाखाली दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते. अमूलनंतर ‘नंदिनी’ ही भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची डेअरी सहकारी संस्था आहे. ३५ लाखांहून अधिक शेतकरी जिल्हास्तरीय दूध सहकारी महासंघांमार्फत केएमएफला दूध पुरवठा करतात. या संस्थेची वर्षाला २५ हजार कोटींची वार्षिक उलाढाल आहे. अशा या नफ्यात असणाऱ्या संस्थेचं अमूलमध्ये विलीनीकरण करण्याबाबतचं विधान अमित शाह यांनी केलं. यामुळे अमित शाहांच्या विधानावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला.