कर्नाटकमध्ये २०२३ साली विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच कर्नाटक काँग्रेसमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तो संघर्ष होता कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी.के शिवकुमार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवर याचा परिणाम दिसण्याची चिन्ह होती.

मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रे’चं आयोजन करण्यात आलं आहे. ही यात्रा तामिळानाडू, केरळमधून कर्नाटक राज्यात पोहचली. आगामी विधानसभा लक्षात घेता सर्वात जास्त २४ दिवस ‘भारत जोडो यात्रे’ने कर्नाटकात प्रवास केला. याचा फायदा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा, विधानसभा निवडणूक तसेच, डी. के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील मतभेद दूर करण्यास झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा : मर्जीतील अधिकारी न मिळाल्याने ‘महागठबंधन’मध्ये रंगलं ‘राजकारण’; २०१७ ची पुनरावृत्ती होणार?

कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाचं अस्तित्व संपलं आहे. ‘भारत जोडो यात्रे’साठी कार्यकर्त्यांची लोकांची जमवाजमव करू शकेल का? असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र, ‘भारत जोडो यात्रे’ला कर्नाटकमध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून बऱ्याच जणांना विश्वास बसेना झाला आहे. पण, या गर्दीचे रुपांतर मतदानात होते का हे पाहावं लागणार आहे.

‘भारत जोडो यात्रा’ जुन्या म्हैसूरच्या वैक्कलिगा, हार्टलँडसारख्या भागातून गेली. त्याचा या परिसरात नक्कीच फायदा काँग्रेसला होईल. मात्र, किनारपट्टीचा ज्या भागातून पदयात्रेने प्रवास नाही केला, तिथे याचा फटका बसण्याचा शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : ‘हात छाटण्‍याच्‍या’ धमकीने देवेंद्र भुयार पुन्‍हा चर्चेत

काँग्रेसचे नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हटलं, “कर्नाटक विधासभेसाठी आम्ही तयार आहोत. प्रत्येक मतदारसंघ आणि जिल्ह्यांतील काँग्रेसचे कार्यकर्ते ‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधीबरोबर पदयात्रेत सहभागी झाले होते. कर्नाटकात ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी झाली असून, आगामी काळात याचे परिणात दिसतील,” असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं.

“कर्नाटक विधानसभेत काँग्रेस पक्ष १५० च्यावरती जागांवर विजय प्राप्त करेल. ‘भारत जोडो यात्रे’मुळे काँग्रेस पक्षाला मिळालेली उभारी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील. येणाऱ्या कालावधीत सरकारच्या विरोधात वेगवेगळे मुद्दे घेऊन आणखी जोमाने रस्त्यावर उतरु,” असे डी. के शिवकुमार यांनी स्पष्ट केलं.