कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता येथील सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारीदेखील सुरू केली आहे. येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा निवडणूक समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक समितीच्या प्रमुखपदी येडियुरप्पा यांच्या विश्वासू म्हणून ओळख असलेल्या शोभा करंदालजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> विरोधक एकत्र येऊ नयेत यासाठीच भाजपाने अफवा पसरवली; डीएमके-जेडीयूचा आरोप

शोभा करंदालजे उडपी-चिकमंगळूर मतदारसंघाच्या खासदार असून कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत. शोभा यांची दक्षिणेकडील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळख आहे. कर्नाटकमधील राजकीय प्रस्थ आणि संघटनकौशल्य लक्षात घेता त्यांची निवडणूक समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.

‘संकल्प रथयात्रे’मध्ये शोभा यांचा सक्रिय सहभाग

शोभा करंदालजे कर्नाटकमध्ये महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वोक्कीलिगा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. १९९७ साली त्यांची उडपी जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १९९९ साली येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘संकल्प रथयात्रे’मध्ये शोभा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून त्या येडियुरप्पा यांच्या विश्वासू मानल्या जातात.

हेही वाचा >> महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी के कवितांचे दिल्लीत उपोषण; मोदी सरकारवर टीका

राजकीय वर्तुळात शोभाक्का म्हणून ओळख

शोभा करंदालजे यांची २००० साली कर्नाटक भाजपा प्रदेशच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर चार वर्षांनी त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली. २००८ साली त्यांनी बंगळुरूमधील यशवंतपूर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा दणदणीत विजय झाला होता. शोभा करंदालजे यांची राजकीय वर्तुळात शोभाक्का म्हणून ओळख आहे.

हेही वाचा >> ‘ईडी’चा ससेमिरा सुरू असताना ‘तिसरी आघाडी’ दिल्लीत आक्रमक

दरम्यान, शोभाक्का यांना मोठा राजकीय अनुभव आहे. त्यांचा कर्नाटकच्या राजकारणात दबदबा आहे. म्हणूनच भाजपाने त्यांच्यावर या निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. शोभा मिळालेल्या संधीचे सोने करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 b s yediyurappa loyalist shobha karandlaje made bjp election committee chief prd