कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच कारणामुळे येथे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येथील नेतेमंडळीही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक भाजपामध्ये सध्या गटबाजी पाहायला मिळत आहे. तिकिटासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. असे असतानाच दावनगेरे लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार सिद्धेश्वरा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. बसवराज बोम्मई यांनादेखील तिकीट मिळणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही, असे सिद्धेश्वरा म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> Karnataka Election 2023 : बी एस येडियुरप्पांमुळे भाजपात अंतर्गत खदखद, पुत्र विजयेंद्र यांना तिकीट मिळणार?
चार ते सहा आमदारांचा पत्ता कट?
पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कर्नाटक भाजपामधील नेत्यांमध्ये चुरस आहे. असे असतानाच काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांनी भाजपाच्या विद्यमान आमदारांपैकी साधारण चार ते सहा आमदारांना पुन्हा तिकीट दिले जाणार नाही, असे विधान केले होते. साधारण २० टक्के आमदारांना पुन्हा तिकीट न देण्यावर भाजपातील वरिष्ठांमध्ये चर्चा केली जात आहे. याच कारणामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
बोम्मई यांनादेखील तिकीट मिळणार की नाही याची आम्हाला कल्पना नाही
याच अस्थिरतेवर सिद्धेश्वरा यांनी भाष्य केले आहे. “निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होईल. या बैठकीत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, हे ठरवले जाईल. सध्या बसवराज बोम्मई यांनादेखील तिकीट मिळणार की नाही हे अस्पष्ट आहे,” असे सिद्धेश्वरा म्हणाले.
हेही वाचा >>> Karnataka Election: मंड्या येथील पंतप्रधान मोदींच्या मिरवणुकीमुळे भाजपात जोष; हिंदुत्वाच्या मुद्द्याची धार कमी करण्याची सूचना
येडियुरप्पा यांना थांबवावी लागली यात्रा
तिकीटवाटपावरून भाजपा नेत्यांमध्ये अस्थितरता पाहायला मिळत आहे. याची प्रचिती बी एस येडियुरप्पा यांच्या ‘विजय संकल्प यात्रे’मध्ये आली. येडियुरप्पा चिकमंगलुरू जिल्ह्यातील मुदिगिरी मतदारंसघाच्या दौऱ्यावर होते. येथे त्यांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुदिगिरी मतदारसंघातून विद्यमान आमदार एम पी कुमारस्वामी यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा यांचा ताफा अडवला. तर दुसरीकडे कुमारस्वामी यांच्या समर्थकांनीही येऊन घोषणाबाजी केली. या प्रसंगामुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी येडियुरप्पा यांना आपली यात्रा थांबवावी लागली.
भ्रष्टाचार आणि सरकारच्या अपयशामुळेच भाजपाचे वरिष्ठ बोम्मई यांच्यावर नाराज?
खासदार सिद्धेश्वरा यांच्या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. विद्यमान आमदार बसवराज बोम्मई यांना उमेदवारी मिळण्याची शाश्वती नाही. म्हणजेच कर्नाटकमधील जनतेच्या मनात भाजपाविषयी नाराजी असल्याचे, भाजपातील वरिष्ठांनी ओळखले आहे. सरकारमधील भ्रष्टाचार आणि सरकारचे अपयश यामुळेच भाजपाचे वरिष्ठ नेते बोम्मई यांच्यावर नाराज आहेत का? असा सवालही काँग्रेसने केला आहे.
हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीसाठी बसपाची रणनीती काय? मुस्लिमांची मते कोणाला मिळणार?
दरम्यान, उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपामध्ये अनेक नेत्यांकडून प्रयत्न केला जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर यातील काही नेत्यांना तिकीट दिले जाईल. तर काहींना डावलण्यात येईल. त्यामुळे पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर होणाऱ्या बंडखोरीला भाजपा कसे रोखणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.