karnataka assembly election : कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावेळी ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चय काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे. त्यानुसार येथे विरोधकांनी तयारीदेखील सुरू केली आहे. तर काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली असून भाजपाच्या नेत्यांकडून सभा, समारंभ, बैठकांचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील या निवडणुकीत लक्ष घातले आहे. दरम्यान, भाजपाच्या एका आमदाराने कर्नाटकमधील मुस्लीम मतदारांची तुलना टिपू सुलतन यांच्याशी केली आहे. तसेच कोणत्याही मुस्लीम उमेदवाराला मत करू नये, असा आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा >> आमदार, खासदार, मुख्यमंत्री झालो, मोदींचीच आशीर्वाद,’ बी एस येडियुरप्पांचे विधान
तुमच्या मतदारसंघात १ लाख टिपू सुलतान मग…
भाजपाचे विजापूर येथील आमदार बासानगौडा पाटील यत्नल यांनी मुस्लीम समाजाच्या नेत्याला मतदान करू नये, असे मतदारांना आवाहन केले आहे. “मला सर्वजन विचारतात की, तुमच्या मतदारसंघात जवळपास १ लाख टिपू सुलतान (मुस्लीम मतदार) आहेत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहात. मग तुम्ही येथून निवडून कसे याल? मात्र भविष्यातही टिपू सुलतान यांना मानणारा उमेदवार विजापूर येथून निवडून येणार नाही. फक्त शिवाजी महाराज यांचे अनुयायीच येथून निवडून येतील. तुम्ही चुकूनही मुस्लीम उमेदवाराला मतदान करू नये,” असे बासानगौडा पाटील यत्नल म्हणाले.
हेही वाचा >> मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विरोधी पक्षनेतेपदावर डोळा; वसुंधरा राजेंचं वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन!
आपण पुरोगामी विचारांना प्राधान्य द्यायला हवे
दरम्यान, भाजपा आमदाराने केलेल्या या विधानावर काँग्रेसने आक्षेप व्यक्त केला. यत्नल यांनी केलेल्या विधानावर काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणात अशा प्रकारचे विचार आणणे चुकीचे आहे. आपण कानडी नागरिक आहोत. आपण पुरोगामी राजकारणाला प्राधान्य देणारे आहोत. भाजपाने विकासावर बोलायला हवे. विकासावर भाष्य करूनच त्यांनी मत मागायला हवे,” असे खरगे म्हणाले आहेत.