विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथे सत्ताधारी भाजपा आणि विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते बसवराज बोम्मई यांनी शिग्गाव मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शक्तीप्रदर्शन करत काँग्रेस तसेच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यावर सडकून टीका केली. मी पळून जाणार मुख्यमंत्री नाही, असे बोम्मई सिद्धरामय्या यांनी उद्देशून म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी मतदारसंघ बदलणारा मुख्यमंत्री नाही- बोम्मई

“मी येथे किती विकासकामे केलेली आहेत, हे शिग्गाव मतदारसंघातील जनतेला माहिती आहे. मी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही. मी दुसरा सुरक्षित मतदारसंघाची निवड करणार आहे, अशी चर्चा केली जात होती. मात्र मी पळून जाणारा मुख्यमंत्री नाही. मी प्रत्येक निवडणुकीत मतदारसंघ बदलणारा मुख्यमंत्री नाही. माझ्या विजय आणि पराभवाचा निर्णय शिग्गाव मतदारसंघातील लोकच घेतील. ही जनताच माझी मालक आहे,” असे बोम्मई म्हणाले.

शिग्गाव मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक जिंकली- बोम्मई

बोम्मई यांनी वरील विधान सिद्धरामय्या यांना उद्देशून केले आहे. कारण सिद्धरामय्या यांनी बुधवारी बदामी मतदारसंघाऐवजी वरुणा या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोम्मई मागील तीन निवडणुकांमध्ये शिग्गाव याच मतदारसंघातून निवडणूक जिंकलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना बोम्मई यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, तसेच कानडी सिनेसृष्टीतील अभिनेते किच्चा सुदीप उपस्थित होते.

निधनानंतर शिग्गावच्याच मातीत अंत्यसंस्कार करावेत- बोम्मई

“येथील जनतेने मला आशीर्वाद दिलेला आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी येथील लोकांसाठी काम करणार आहे. माझे निधन झाल्यानंतर माझ्यावर शिग्गावच्याच मातीत अंत्यसंस्कार करावेत,” असे भावनिक भाष्य यावेळी बोम्मई यांनी केले. बोम्मई यांनी या भागात केलेल्या विकासकामांचाही उल्लेख केला. “मी आतापर्यंत या भागाला पाणीपुरवठा केलेला आहे. या भागात २ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले आहेत. तसेच जिल्ह्यात १० हजार घरे उभारली आहेत,” असे बोम्मई म्हणाले.

विकासाची गंगा वाहत राहावी म्हणून कमळाला मत द्या- नड्डा

जेपी नड्डा यांनीदेखील आपल्या भाषणात बोम्मई यांचे कौतुक केले. “तुमचा उत्साह पाहून तुम्ही बोम्मई यांना विधानसभेत पाठवण्याचा निश्चय केल्याचे वाटत आहे. मी फक्त बोम्मई यांना पाठिंबा द्या, असे आवाहन करण्यासाठी आलेलो नाही. तर तुमचे मत मी बोम्मई यांच्यासह कमळालाही द्यावे, असे सांगण्यासाठी आलो आहे. विकासाची गंगा वाहत राहावी म्हणून तुम्ही कमळाला मत द्यावे,” असे नड्डा म्हणाले.

काँग्रेस कर्नाटकाचा एटीएमसारखा वापर करेल- नड्डा

नड्डा यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही जोरदार टीका केली. काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकाचा एटीएमसारखा वापर करेल. तसेच काँग्रेस पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी उठवेल, असा दावा करत त्यांनी मतदारांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले.

येडियुरप्पा यांच्या मुलानेही उमेदवारी अर्ज दाखल केला

दरम्यान, बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते येडियुरप्पा यांच्या शिकारीपुरा या मतदासंघातून निविडणूक लढवणार आहेत. आपल्या मुलासाठी येडियुरप्पा यांनी जुलै २०२२ साली ही जागा सोडली होती. तसेच मुलाला याच मतदारसंघातून तिकीट मिळावे, यासाठी येडियुरप्पा यांनी प्रयत्न केले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly election 2023 cm basavaraj bommai filed nomination from shiggaon constituency criticizes siddaramaiah prd