कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच कारणामुळे येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस यांच्यासारखे प्रमुख पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सभा, बैठकांचे आयोजन करत आहेत. निवडणूक घोषणा कधीही होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेता आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडत आहेत. दरम्यान, काँग्रेसमध्ये कर्नाटकमधील नेत्यांवर अन्याय होतो, त्यांना वाईट वागणून दिली जाते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यालाच कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. शिवकुमार यांनी बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर अन्याय झाल्याचे म्हणत मोदी तसेच भाजपावर टीका केली.
हेही वाचा >> सिसोदियांच्या अटकेवर काँग्रेसची सावध प्रतिक्रिया; अजय माकन यांचा मात्र ‘आप’वर भ्रष्टाचाराचा आरोप, सीबीआयचे केले कौतुक
मोदींकडून येडियुरप्पा यांचे तोंडभरून कौतूक
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवमोग्गा येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. शिवमोग्गा हा येडियुरप्पा यांचा जिल्हा आहे. या कार्यक्रमाला मोदी हेदेखील उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी येडियुरप्पा यांची भरपूर स्तुती केली. तसेच येडियुरप्पा यांच्या गौरवार्थ सभेसाठी उपस्थित असलेल्या जनतेला मोबाईलचा प्लॅश सुरू करण्याचे आवाहन केले. येडियुरप्पा यांनी नुकतेच निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे. येडियुरप्पा यांचे लिंगायत समाजात मोठा प्रस्थ आहे. म्हणूनच लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी मोदी यांनी येडियुरप्पा यांची स्तुती केली. हाच धगा पकडून शिवकुमार यांनी भाजपाला लक्ष्य केले. “आम्हाला भाजपाकडून फक्त कौतूक नको आहे. समाज आणि व्यक्ती महत्त्वाची आहे. येथील मतदार मुर्ख नसून ते त्यांचे निर्णय स्वत: घेण्यास सक्षम आहेत. भाजपाने जनतेला कसे वागवलेले आहे, हे सर्वांनाच माहिती आहे,” असे शिवकुमार म्हणाले.
हेही वाचा >>> karnataka election 2023 : ‘मुस्लीम उमेदवाराला चुकूनही मत देऊ नका,’ भाजपा आमदाराचे विधान; म्हणाले, “टिपू सुलतान…”
ज्याच्या नेतृत्वात निवडणूक जिंकली, त्यालाच बाजूला सारले- शिवकुमार
२०२१ साली जुलै महिन्यात येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. दिल्लीमधील हायकमांडच्या आदेशाचे त्यांना पालन करावे लागले होते. याच मुद्द्यावरून शिवकुमार यांनी मोदी तसेच भाजपाला क्ष्य केले. भाजपाने २०१८ साली येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या तब्बल १०४ जागा जिंकल्या. याच नेत्याला नंतर बाजुला सारण्यात आले. याचे खरे कारण भाजपाने सांगावे. येडियुरप्पा यांना जेव्हा मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. याबाबत मोदी यांनी बोलावे, अशी बोचरी टीका शिवकुमार यांनी केली.
येडियुरप्पा यांच्या नातेवाईकांमागे चौकशांचा ससेमीरा
“येडियुरप्पा यांच्या जवळचे मित्र, परिवार तसेच त्यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर विभाग, ईडीच्यामार्फत कारवाई करण्यात आली. या कारवायांचा अर्थ काय होतो? येडियुरप्पा यांच्या आप्तेष्टांना किती वेळा समन्स बजावण्यात आले, याचाही मोदी यांनी खुलासा करावा,” असेही शिवकुमार म्हणाले.
हेही वाचा >> मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विरोधी पक्षनेतेपदावर डोळा; वसुंधरा राजेंचं वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन!
काँग्रेसमध्ये कर्नाटकमधील नेत्यांना वाईट वागणूक- मोदी
दरम्यान, सोमवारी पंतप्रधान मोदी कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येडियुरप्पा यांचे तोंडभरून कौतूक केले. तसेच रोड शोदरम्यान त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेस पक्ष कर्नाटकमधील नेत्यांना वाईट वागणूक देतो, असा आरोप मोदी यांनी केला. हा आरोप करताना त्यांनी एस निजलिंगप्पा, विरेंद्र पाटील, मल्लिकार्जुन खरगे अशा नेत्यांची नावे घेतली. लिंगायत समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी तसेच भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. हाच हेतू समोर ठेवून मोदी यांनी वरील टीका केली होती.