कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार असून भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. भाजपाने आपल्या प्रचारात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रचारात उतरवले आहे. मोदी यांनी आज (३ मे) चित्रदुर्गा येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी काँग्रेस पक्ष दहशतवादाला प्रोत्साहन देतो, असा आरोप केला. तसेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल या संघटनेवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. हाच मुद्दा घेऊन काँग्रेस भगवान हनुमानाला बंदी करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला.
काँग्रेसने हनुमानाला बंद करण्याचा निर्णय घेतला- मोदी
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून निवडून आल्यास पीएफआय तसेच बजरंग दल अशा संघटनांवर आम्ही बंदी घालू, असे आश्वासन दिले आहे. हाच मुद्दा घेऊन मोदी यांनी काँग्रेसकडून दहशतवादाला पोसले जाते, असा गंभीर आरोप केला आहे. “भाजपाने दहशतवादाचा कणा मोडला आहे. मात्र काँग्रेसकडून दहशतवादाला पाठिंबा दिला जातो. काँग्रेसने भगवान हनुमानाला बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केले आहे,” अशी टीका मोदी यांनी केली.
हेही वाचा >>> कर्नाटकातील प्रचारात राम, हनुमान, टिपू सुलतान
काँग्रेसला ‘बजरंग बली की जय’ म्हणणाऱ्यांची अडचण- मोदी
“अगोदर त्यांनी प्रभू रामांना बंद केले होते. त्यानंतर आता त्यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची शपथ घेतली आहे. काँग्रेसला प्रभू राम यांची अडचण असून हे दुर्दैवी आहे. आता तर जे ‘बजरंग बली की जय’, म्हणतात त्यांचीदेखील काँग्रेसला अडचण होत आहे,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजपाने दहशतवाद्यांचा कणा मोडला- मोदी
“देशाच्या जवानांनी बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले. जवानांच्या या कारवाईवरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. कर्नाटकमध्ये काँग्रेसने दहशतवादाला पाठिंबा दिला आहे. भाजपाने मात्र दहशतवाद्यांचा कणा मोडला आहे. भाजपाने तुष्टीकरणाचा खेळ संपवला आहे,” असा दावा मोदी यांनी केला.
हेही वाचा >>> पैसे काय झाडाला लागतात का? कर्नाटकात तरी लागलेत… वाचा कसे ते?
काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचा पुरस्कार केला जातो- मोदी
“कर्नाटकच्या लोकांनी काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांपासून दूर राहावे. हे दोन वेगवेगळे पक्ष वाटत असले तरी त्यांची कृती ही सारखीच आहे. दोन्ही पक्षांत घराणेशाही आहे. हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचाराचा पुरस्कार करतात. तसेच विभाजनवादी राजकारण करतात. या दोन्ही पक्षांचा मुख्य उद्देश कर्नाटकचा विकास हा नव्हता. त्यांना तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता नाही,” अशी घणाघाती टीका मोदी यांनी काँग्रेस आणि जेडीएसवर केली.
नरेंद्र मोदी यांची प्रियांक खरगे यांच्यावर टीका
रायछूर जिल्ह्यातील सिंधानूर येथील सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी मूळचे कर्नाटकचे नेते तथा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांनाही लक्ष्य केले. “काँग्रेसचे अनुभवी नेते मल्लिकार्जुन खरगे मला साप म्हणतात. गांधी परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी माझ्यावर ते अशा प्रकारची टीका करतात. मल्लिकार्जुन खरगे यांनी जे विधान केले, तसेच विधान प्रियांक यांनीदेखील केले. जे वडील बोलतात ते प्रियांकदेखील बोलतात,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा >>> नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य कायम
…तर कर्नाटकची तिजोरी रिकामी होईल- मोदी
दरम्यान, आम्ही निवडून येणार नाही, असा काँग्रेसला विश्वास आहे. याच कारणामुळे काँग्रेसकडून मोठी आश्वासने दिली जात आहेत. त्यांच्या आश्वासनांमुळे राज्याची तिजोरी रिकामी होईल, अशी टीका मोदी यांनी केली.