कोणत्याही क्षणी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता भाजपासह काँग्रेसनेही कंबर कसली आहे. येथील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने आतापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अन्य नेते कर्नाटकचे सातत्याने दौरे करत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिल्लीतील हायकमांड नाराज असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी हुबळी आणि धारवाड येथे विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. या कार्यक्रमातही ही नाराजी स्पष्टपणे दिसली.
हेही वाचा >> भाजपाचे ‘मिशन ओडिशा’ सुरू; BJD चे मैत्रीपूर्ण संबंध बाजूला सारत २०२४ ची निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य
मोदी यांनी नेत्यांचा उल्लेख करणे टाळले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. भाषणाला सुरुवात करताना मंचावर उपस्थित असलेल्या नेत्यांची नावे घेण्याचा प्रघात आहे. मात्र मंड्या येथे विकासकामांचे उद्घाटनादरम्यान भाषण करताना मोदी यांनी मंचावरील एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. त्यांनी मंड्या येथील जनतेचा उल्लेख करत भाषणाला सुरुवात केली. कर्नाटकमधील स्थानिक नेत्यांवर नाराज असल्यामुळे मोदी यांनी कोणाचाही उल्लेख केला नाही, असे भाजपाच्या वर्तुळात म्हटले जात आहे. मोदी यांनी आपल्या भाषणात विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचेदेखील नाव घेतले नाही.
हेही वाचा >> काँग्रेस पक्षाची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस
कर्नाटक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप
मागी काही दिवसांपासून कर्नाटक सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. हे सरकार ४० टक्के कमिशन मागणारे सरकार आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असे असतानाच २ मार्च रोजी येथील लोकायुक्त पोलिसांनी भाजपाचे आमदार मदल विरूपाक्षप्पा यांच्या मुलावर केलेल्या कारवाईमुळे भाजपा बॅकफूटवर गेलेली आहे. विरूपाक्षप्पा यांची येडियुरप्पा यांच्या जवळचे नेते म्हणून ओळख आहे. विरूपाक्षप्पा यांच्या मुलावर कंत्राटदारांकडून पैसे मागितल्याचा आरोप आहे. निवडणूक तोंडावर असताना हे प्रकरण समोर आल्यामुळे भाजपातील हायकमांड कर्नाटकच्या नेत्यांवर नाराज आहे. याच कारणामुळे मोदी यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही, असे मत भाजपाच्या काही नेत्यांनी व्यक्त कले.
हेही वाचा >> Jalandhar by election : चरणजितसिंह चन्नी यांना झटका, पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून महिला उमेदवार!
कर्नाटक भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी
दरम्यान, एकीकडे निवडणूक तोंडावर आलेली असताना कर्नाटक भाजपामधे गटबाजीला उधाण आले आहे. एखादा केंद्रीय मंत्री किंवा दिल्लीतील बडा नेता कर्नाटकच्या दौऱ्यावर असेल, तेव्हाच येथे नेते एकजुटीने काम करताना दिसतात. अन्यथा बी एस येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, कर्नाटक भाजपाचे बीएल संथोश समर्थक असे गट पडलेले दिसतात. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीला भाजपा कसे तोंड देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.