कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. येथे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे. तर भाजपाची सत्ता उलथवून लावण्यासाठी काँग्रेसकडून जोमात प्रचार केला जात आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या उमेदवाराचे नाव शामानूर शिवशंकरप्पा असून ते ९२ वर्षांचे आहेत. ते सध्या देशात सर्वाधिक वय असलेले आमदार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांना यावेळीही तिकीट दिले असून ते दावणगेरे दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा >> “जम्मू आणि काश्मीरमधील हिंदूंना अल्पसंख्याकांचा दर्जा द्यायचा असेल तर…” NCM सदस्या सईद शहजादी यांची प्रतिक्रिया
पाच वेळा आमदार, एकदा खासदार
शिवशंकरप्पा हे उद्योजक आहेत. उद्योग विश्वास नाव कमावल्यानंतर ते राजकारणात आले. लिंगायत समाजाचे ते एक महत्त्वाचे नेते मानले जातात. विशेष म्हणजे कर्नाटकमधील ऑल इंडिया विरशैव महासभा या संघटनेचे ते प्रमुख आहे. दावणगेरे जिल्ह्यामध्ये त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांनी आतापर्यंत पाच वेळा विधानसभा तर एकदा लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे. यावेळीही दावणगेरे दक्षिण मतदारसंघातील ते प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २००८ सालापासून हा मतदारसंघ शिवशंकरप्पा यांच्याच ताब्यात आहे.
१९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पराभव
शिवशंकरप्पा यांनी १९९९ साली दावणगेरे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसने उत्तम कामगिरी केली होती. सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याऐवजी कर्नाटकमधील बेल्लारी येथून निवडणूक लढवली होती. सोनिया गांधी यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. याच वर्षी शिवशंकरप्पा यांच्या जागेवर त्यांचे पुत्र एसएस मल्लिकार्जुन यांनी आमदाराकीची निवडणूक लढवली होती.
हेही वाचा >> सचिन पायलट अशोक गेहलोत सरकरविरोधात पुन्हा आक्रमक, म्हणाले “उपोषणाला आठवडा झाला, पण…”
जगदीश शेट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी बजावली महत्त्वाची भूमिका
शिवशंकरप्पा यांचा शिक्षण क्षेत्रातही चांगलाच दबदबा आहे. कारण त्यांच्याकडे बापूजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद आहे. या संस्थेच्या अंतर्गत एकूण ५४ महाविद्यालये आहेत. भाजपाचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी शिवशंकरप्पा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले जाते. शेट्टर यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे भाजपाला या निवडणुकीत चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी शिवशंकरप्पा आणि काँग्रएसचे प्रचार समितीचे प्रमुख एमबी पाटील यांच्याशी चर्चा केली होती, असे म्हटले जाते. सिद्धरामय्या सरकारमध्ये शिवशंकरप्पा हे फलोत्पादनमंत्री होते.