अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपासह काँग्रेस तसेच अन्य पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, भाजपाने येथे प्रचाराला आतापासून सुरुवात केली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या निवडणुकीत लक्ष घातले आहे. कर्नाटकमध्ये सध्या बसवराज बोम्मई हे सत्ताशकट हाकत आहेत. तर आगामी निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
भाजपा निवडणूक मोदींच्याच नावाने लढवणार
कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाने अद्याप आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. सध्या येथील भाजपा सरकारचे सर्वेसर्वा बसवराज बोम्मई हे असले तरी या वेळच्या विधानसभा निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. कारण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी कर्नाटकमध्ये आतापर्यंत अनेक सभा घेतल्या आहेत. मात्र या सभांमध्ये त्यांनी भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार यावर भाष्य केलेले नाही. भाजपा कर्नाटकमधील निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नावाने लढवण्याची शक्यता आहे. मोदी-शाह या द्वयीच्या भाषणांतून सध्यातरी हेच प्रतीत होत आहे.
तुम्ही तर उभे राहायला हवे
आगामी एप्रिल किंवा मे महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. ही निवडणूक भाजपा मोदी, बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची शक्यता आहे. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास गमावल्याचे म्हटले जात आहे. कारण कर्नाटकमधील सभा तसेच कार्यक्रमांत मोदी, शाह बोम्मईंचा उल्लेख टाळत आहेत. त्याऐवजी ते निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतलेल्या येडियुरप्पा यांचा वारंवार उल्लेख करत आहेत. २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कर्नाटकमध्ये एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रामध्ये अमित शाह बोलत होते. या वेळी बोलताना अमित शाहा यांनी बोम्मई यांना उद्देशून सूचक विधान केले होते. ‘जनतेमध्ये बसू नका. तुम्ही तर उभे राहायला हवे,’ असे शाह म्हणाले होते. शाह यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
येडियुरप्पा पुन्हा एकदा सक्रिय होणार का?
याच दिवशी शाह यांनी बाल्लारी येथे एका सभेला संबोधित केले. येथेही त्यांनी बोम्मई यांच्या नेतृत्वाबाबत थेट भाष्य करणे टाळले. त्याऐवजी, “कृपया मोदी आणि येडियुरप्पा यांच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला कर्नाटकला भ्रष्टाचारमुक्त करणारे सरकार देऊ. दक्षिण भारतात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर कसा राहील, यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे अमित शाह म्हणाले. भाजपाच्या दिल्लीमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये बसवराज यांच्याप्रति असलेल्या अविश्वासामुळे पुन्हा एकदा येडियुरप्पा निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
…म्हणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही?
एकीकडे येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर दुसरीकडे बोम्मई यांच्याविषयी असलेली नकारात्मकता, यामुळे भाजपाने कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सध्याच जाहीर न करणे पसंत केले आहे. याबाबत भाजपाच्या नेत्याने अधिक माहिती दिली आहे. “बोम्मई यांना आता पक्षाचा पाठिंबा राहिलेला नाही. अमित शाह यांनी बोम्मई यांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील,” असे या नेत्याने म्हटले आहे.
येडियुरप्पांनंतर बोम्मई यांच्याकडे नेतृत्व
बसवराज बोम्मई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्या नातेवाईकांचा राज्य कारभारामध्ये हस्तक्षेप वाढत आहे, असा आरोपही केला जात होता. याच कारणामुळे जुलै २०२१ मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या जागेवर लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून बोम्मई यांना संधी देण्यात आली होती. मुख्यमंत्रीपद आल्यानंतर बोम्मई यांनी अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये एससी, एसटी प्रवर्गासाठी सहा टक्के आरक्षणवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर बोम्मई यांची जनतेमध्ये लोकप्रियता वाढली होती.
पुन्हा एकदा येडियुरप्पा यांना संधी दिली?
पुढे बोम्मई यांच्या उदयानंतर येडियुरप्पा मुख्य राजकारणातून बाहेर फेकले गेले. याच कारणामुळे ते अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अनेक सभांना अनुपस्थित राहू लागले. दरम्यान, आता येडियुरप्पा पुन्हा एकदा भाजपा हायकमांडची मर्जी संपादन करण्यात यशस्वी होत आहेत. कर्नाटकमधील अनेक कार्यक्रमांत अमित शाह येडियुरप्पांची उघड प्रशंसा करत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात बसवराज बोम्मई यांना बाजूला सारून पुन्हा एकदा येडियुरप्पा यांना संधी दिली जाणार का? असे विचारले जात आहे.
आमच्यात कोणताही वाद नाही- बोम्मई
दरम्यान, येडियुरप्पा आणि बोम्मई यांच्यात कलह असल्याचे म्हटले जाते. मात्र आमच्यात कोणताही वाद नाही, असे स्पष्टीकरण बसवराज बोम्मई यांनी याआधी अनेकदा दिलेले आहे. “येडियुरप्पा आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्याशी चर्चा करूनच आमची रणनीती ठरते. आम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे. आमच्यात वडील-पुत्रासारखे नाते आहे. आमच्यात मतभेद असण्याचा प्रश्नच नाही,” असे बोम्मई मागील वर्षी डिसेंबरमध्ये म्हणाले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.