लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार संसदेत तसेच त्या-त्या राज्यांच्या विधानसभेत लोकांच्या समस्या मांडतात. त्या समस्यांवर विचार करून सरकार त्यावर योग्य तो निर्णय घेते. वेळ आलीच तर जनतेच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे लोकप्रतिनिधी आंदोलन, निदर्शने, उपोषण, सत्याग्रह अशा वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. काही आमदार, खासदार तर संसद आणि विधानसभेत येताना वेगवेगळी वेशभूषा करून तसेच वेगवेगळ्या पद्धतीने लोकप्रतिनिधिगृहाच्या आवारात प्रवेश करून माध्यमांत चर्चेचा विषय ठरतात. कर्नाटकचे नवनिर्वाचित आमदार रवी गनिगा यांनीदेखील खास पद्धतीने लोकप्रतिनिधिगृहात प्रवेश करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत काही आमदार तसेच खासदारांनी लोकप्रतिनिधिगृहात केलेल्या ‘खास एन्ट्री’बद्दल जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची महाआघाडी होणार का? ‘नितीश कुमार फॅक्टर’चे महत्त्व काय?

कर्नाटकात काँग्रेसच्या नेत्यांचा थेट बैलगाडीन प्रवास

कर्नाटकमध्ये नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनादरम्यान, नवनिर्वाचित आमदार रवी गनिगा यांनी थेट बैलगाडीतून प्रवास करत कर्नाटकच्या विधानसभा प्रांगणात प्रवेश केला. गनिगा यांच्या आगळ्यावेगळ्या प्रवेशाची चांगलीच चर्चा होत आहे. याआधी १४ सप्टेंबर २०२१ रोजी कर्नाटकच्या विधानसभेमध्ये असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले होते. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे दोन नेते चक्क बैलगाडीमध्ये बसून आले होते. तेव्हा भाजपा सरकार इंधन दरवाढ तसेच महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप सिद्धरामय्या आणि शिवकुमार या द्वयीने केला होता. तसेच आम्ही हा मुद्दा विधानसभेत तसेच विधानसभेच्या बाहेरही उपस्थित करू, असेही हे दोन नेते म्हणाले होते.

हेही वाचा >> विरोधकांच्या गाठीभेटीनंतर नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची आज काँग्रेससोबत बैठक; विरोधक पाटण्यात शक्तिप्रदर्शन करणार

काँग्रेसचे सर्वच नेते काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांनी २१ मार्च रोजी आगळेवेगळे आंदोलन केले होते. तेव्हा काँग्रेसच्या बहुतांश खासदारांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून संसदेच्या सभागृहात प्रवेश केला होता. तसेच खासदार टीएन राथपन हिबी ऐडन, ज्योती मनी एस, राम्या हरीदास आदी खासदारांनी सभागृहातील खुल्या जागेवर जाऊन मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. तसेच सोबत आणलेली कागदपत्रे फाडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने फेकली होती. काँग्रेसचे बहुतांश नेते पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. मात्र जेव्हा जेव्हा निषेध व्यक्त करायचा असेल, तेव्हा तेव्हा काँग्रेसचे नेते काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यातही काँग्रेसच्या खासदारांनी महागाई, बेरोजगारी, वस्तू व सेवा कराची चुकीची अंमलबजावणी याला विरोध करण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे परिधान करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला होता.

हेही वाचा >> Karnataka : पाच वर्षे सिद्धरामय्याच मुख्यमंत्री, एमबी पाटील यांचा दावा; सत्तास्थापनेनंतर सिद्धरामय्या गटाकडून प्रतिक्रिया

एन शिवप्रसाद यांची वेगवेगळी रूपे

तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) नेते तथा सासदार नारामल्ली शिवप्रसाद हे आंदोलन, निषेधासाठी कायम वेगवेगळ्या वेषभूषा करून संसदेच्या प्रांगणात यायचे. याच कारणामुळे ते कायम चर्चेत असायचे. ते कधी महिलेच्या रूपात साडी परिधान करून यायचे. तर कधी गणवेश परिधान करून शाळेतील विद्यार्थी बनून यायचे. त्यांनी नारद आणि भगवान कृष्णासारखी वेशभूषा करूनही निषेध व्यक्त केलेला आहे. शिवप्रसाद यांनी आंध्र प्रदेशला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत २०१८ साली वेगवेगळी २१ रूपे घेऊन संसदेच्या आवारात प्रवेश केला होता. या वेशभूषेत जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याचादेखील समावेश होता. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर या राज्याला विशेष राज्याचा दर्जा दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, असा दावा शिवप्रसाद यांच्याकडून केला जात होता. याच आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांनी हिटलरची वेषभूषा करत मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. शिवप्रसाद यांचा सप्टेंबर २०१९ मध्ये एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

हेही वाचा >> केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी केजरीवाल ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पुन्हा भेटणार

हार्ले डेव्हिडसनवरून संसदेच्या परिसरात एन्ट्री

खासदार रंजीत रंजन यांनीदेखील ८ मार्च २०१६ रोजी थेट हार्ले डेव्हिडसन या महागड्या बाईकवरून प्रवास करत संसदेच्या आवारात प्रवेश केला होता. महिला दिनाचे औचित्य साधून महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात, हा संदेश देण्यासाठी त्या संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी थेट हार्ले डेव्हिडनसन या बाईकवरून आल्या होत्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka assembly mla bullock cart ride know mla mp special entry in parliament and vidhan sabha prd