कर्नाटक भाजपातील दुफळी समोर आली आहे. बी एस येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून येते भाजपाचे अनेक नेते नाराज आहेत. असे असतानाच आता भाजपाचे नेते बसनगौडा पाटील यत्नल यांनी स्वपक्षावरच गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या शासनकाळात करोना महासाथीदरम्यान तब्बल ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप यत्नल यांनी केला आहे. या आरोपांनंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली असून काँग्रेसनेदेखील भाजपावर टीका केली आहे.
“एकूण ४० हजार कोटी रुपयांची लूट”
बी एस येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना रुग्णखाटांचे भाडे वाढवून दाखवण्यात आले. करोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा खर्च वाढवून सांगण्यात आला, असा आरोप यत्नल यांनी केला. “एक मुखपट्टी ही ४५ रुपयांना मिळते. येडियुरप्पा सरकारने या मुखपट्टीची किंमत ४८५ रुपये असल्याचे दाखवले. येडियुरप्पा यांनी शेकडो कोटी रुपये लुटले आहेत. एकूण ४० हजार कोटी रुपये लुटण्यात आले आहेत. त्यांनी एका करोनाग्रस्तावरील उपचाराचा खर्च ८ ते १० लाख रुपये दाखवलेला आहे,” असा आरोप यत्नल यांनी केला.
काँग्रेसची भाजपावर टीका
यत्नल यांनी आरोप केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपावर टीका केली. या आरोपांनंतर येडियुरप्पा यांचे सरकार हे ४० टक्के कमिशन मागणारे सरकार होते, याला दुजोरा मिळाला आहे, असा आरोप केला सिद्धरामय्या यांनी केला.
“हा भ्रष्टाचार १० पटीने जास्त”
यत्नल यांच्या आरोपांनंतर सिद्धरामय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपाला लक्ष्य केले. “पत्रकार परिषद घेऊन आम्ही येडियुरप्पा सरकारमध्ये ४ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला होता. त्यासाठी आम्ही कागदपत्रे सादर केली होती. करोना उपचार आणि व्यवस्थापनाच्या नावाखाली हा भ्रष्टाचार करण्यात आला होता. मात्र यत्नल यांचा आरोप ग्राह्य धरल्यास हा भ्रष्टाचार आम्ही सांगितलेल्या रकमेच्या १० पट अधिक आहे. आमच्या आरोपांना उत्तर देताना तेव्हाच्या भाजपाच्या मंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेऊन कागदपत्रे दाखवली होती. भाजपाचे हे नेते आता कोठे गेले?” असे सिद्धरामय्या म्हणाले.
प्रियांक खरगे यांची भाजपावर टीका
याच प्रकरणावर कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. यत्नल यांनी केलेल्या आरोपांबाबतची कागदपत्रे सार्वजनिक करायला हवीत. किंवा करोना काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती मायकल यांच्या समितीकडे ही कागदपत्रे सोपवली पाहिजेत, असे खरगे म्हणाले.
भाजपा नेत्यांपुढे अडचण
या भष्टाचारात केंद्राचा तेवढाच सहभाग आहे, असा आरोपही खरगे यांनी केला. दरम्यान, स्वत:च्याच पक्षातील नेत्याने भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे कर्नाटकमधील भाजपा नेते अडचणीत आले आहेत. या आरोपानंतर कर्नाटकमध्ये कोणत्या घडामोडी घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.