Karnataka Loksabha Election 2024: कर्नाटकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. तिथल्या प्रचारामध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेचे एकूण २८ मतदारसंघ आहेत. भाजपाने जनता दल (सेक्युलर) पक्षासोबत युती केली आहे. भाजपा २५ जागांवर तर जेडीएस ३ जागांवर निवडणूक लढवत आहेत. ९१व्या वर्षीही माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींवर नुकतीच केलेली टीका सध्या चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान मोदींवर टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नालायक’ असे म्हटले आहे. अशा व्यक्तीला तुम्ही मत देणार आहात का, असा सवालही त्यांनी कोलारमधील सभेत बोलताना मतदारांना केला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवकांना वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देणार असे आश्वासन दिले होते. मात्र, ते युवकांना पकोडे विकण्यास सांगत आहेत. एकीकडे पदवीनंतर नोकरी मिळण्याची आशा असते, तिथे मोदी तरुणांना पकोडे विकण्यास सांगत आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी नरेंद्र मोदी हे नालायक असल्याचे ठरवले आहे.” कोलार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार के. व्ही. गौथम यांच्या प्रचारसभेत बोलताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन

विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींवर अशाच प्रकारची टीका कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीवेळीही करण्यात आली होती. तेव्हा ती टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र आणि ग्रामविकास मंत्री प्रियांक खरगे यांनी केली होती. विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार करताना त्यांनीही पंतप्रधान मोदींना ‘नालायक’ म्हटल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हा सारवासारव करून त्यांचा बचाव करण्यासाठी सिद्धरामय्या पुढे आले होते.

“नालायक मोदी सत्तेत येण्याआधी पेट्रोल, डिझेल, गॅस, खते, धान्य आणि खाद्यतेलाच्या किमती काय होत्या? गेल्या दहा वर्षांमध्ये ते काहीही न करता मते मागत आहेत. मोदींच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात तुम्हाला फक्त खोटेपणा आणि फसवणूकच पदरात पडली आहे”, असेही ते म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसने दिलेले वचन पूर्ण केले असून प्रत्येक कुटुंबाला आता महिन्याला चार ते सहा हजार रुपये मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘चंबू’वरून रणकंदन

कर्नाटकमध्ये काँग्रेसने एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवरूनही रणकंदन माजले आहे. या जाहिरातीमध्ये रिकामा चंबू दाखवण्यात आला आहे. केंद्रातील एनडीए सरकार कर्नाटकला या रिकाम्या चंबूप्रमाणेच काहीही देत नाही, हा आशय त्या जाहिरातीमधून व्यक्त होतो. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या संदर्भातच एक फोटो ट्विट केल्यानंतर हा वाद आणखी शिगेला पोहोचला आहे. हा फोटो एका प्रचारसभेचा असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडीएसचे प्रमुख देवेगौडा एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. देवेगौडा वाचत असलेल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर काँग्रेसने दिलेली चंबूची जाहिरात दिसून येते. या जाहिरातीमध्ये चंबूला ‘द आर्ट’ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘द आर्टिस्ट’ असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही असाच फोटो ट्विट केला आहे. सध्या यावरून समाजमाध्यमांमधूनही भाजपा आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. २० एप्रिलला काँग्रेसने हातात चंबू घेऊन आंदोलनही केले होते. दुसरीकडे चंबू हे कधीही न संपणारे ‘अक्षय पात्र’ असल्याचे भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे चंबू हे प्रतीक वापरून केलेली टीका तिथल्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

एच. डी. देवेगौडांवर टीका

याआधी बांगरापेठमधील प्रचारसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिल्याबद्दल जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांच्यावरही टीका केली होती. “देवेगौडा आणि मोदी खोटे बोलत आहेत. जर चंबू हे तुम्हाला कधीही न संपणारे ‘अक्षय पात्र’ वाटत असेल, तर राज्य सरकारला त्यांच्या कराचा वाटा का मिळत नाही? दुष्काळ निवारणासाठीची मदत का मिळत नाही? पुराच्या संकटात सरकारला मदत का मिळाली नाही? जर चंबू अक्षय पात्र असेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी का मिळत नाही?” पुढे ते देवेगौडांना उद्देशून म्हणाले की, “पंतप्रधान मोदींचा चंबू हा श्रीमंतांची कोट्यवधींची कर्जे माफ करतो. मात्र, सामान्य लोकांसाठी तो नेहमीच रिक्त भांडे ठरला आहे. जर तुम्हाला तो अक्षय पात्र वाटत असेल, तर राज्यावर झालेला अन्याय आणि नुकसान भरून काढण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी आणून दाखवा.

हेही वाचा : “विरोधी पक्षनेतेपदाचीही मान्यता नसलेली काँग्रेस सत्तेत काय येणार?” माजी पंतप्रधान देवेगौडांची टीका

“मोदींशिवाय पर्याय नाही” : देवेगौडा

वयाच्या ९१ व्या वर्षीही देवेगौडा प्रचारामध्ये उतरले आहेत. १९९९ पासून ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेगौडा यांनी म्हटले आहे की, “देशाचे नेतृत्व करू शकेल, अशी क्षमता इंडिया आघाडीतील कुणामध्ये आहे, ते मला दाखवून द्या. इंडिया आघाडीत अशी एक जरी सक्षम व्यक्ती असेल, मला एक व्यक्ती दाखवून द्या, मग पुढे चर्चा करण्याचीही गरज नाही. सध्या भारतात नरेंद्र मोदींशिवाय दुसरे कुणीही त्या क्षमतेचे नाही. मी ९१ वर्षांचा आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी तिसऱ्यांदा घेऊ शकेल असा माणूस मी तरी पाहिलेला नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka cm siddaramaiah calls pm modi nalayak loksabha election 2024 vsh