कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोठ्या बहुमताने विधानसभेची निवडणूक जिंकली. येथे काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सिद्धरामय्या, तर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी डी. के. शिवकुमार यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, सत्ता आलेली असली तरी येथे काँग्रेसला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे. भाजपाचे नेते वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन सिद्धरामय्या सरकारला लक्ष्य करत आहेत. असे असतानाच स्वपक्षातीलच वरिष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर उघड टीका करत आहेत. हरिप्रसाद यांच्या या भूमिकेमुळे येथे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरिप्रसाद यांची सिद्धरामय्या यांच्यावर टीका

हरिप्रसाद हे विधान परिषदेत आमदार आहेत. भाजपाची सत्ता असताना ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. मात्र, काँग्रेसची सत्ता आल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. मंत्रिपद न मिळण्याला सिद्धरामय्या हेच जबाबदार आहेत, असे हरिप्रसाद यांना वाटते. याच कारणामुळे ते सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत आहेत.

“ते पक्षाचे जबाबदार नेते आहेत, त्यांना…”

हरिप्रसाद यांच्या या भूमिकेमुळे सिद्धरामय्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची हायकमांड दखल घेईल. ज्या अडचणी असतील त्या पक्षापुरत्याच मर्यादित ठेवल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी दिली. “बी. के. हरिप्रसाद हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस तसेच राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. ते पक्षाचे जबाबदार नेते आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य वरिष्ठ नेते याबाबत योग्य तो निर्णय घेतील,” असेही पाटील म्हणाले.

हरिप्रसाद हे शिवकुमार यांचे समर्थक

हरिप्रसाद हे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचे समर्थक मानले जातात. काँग्रेस अंतर्गत शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही नेत्यांनी वाद बाजूला सारून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते आमनेसामने आले होते. त्यानंतर आता हरिप्रसाद हे शिवकुमार यांच्या गटातील असल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. हरिप्रसाद हे ओबीसी समाजातून येतात. गेल्या काही दिवसांपासून ते ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या सभा आयोजित करत आहेत. हरिप्रसाद यांनी नुकतेच बंगळुरू येथे आयोजित केलेल्या एका सभेसाठी ओबीसी समाजाला एकत्र जमवण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रयत्नांतून मी स्वत: सिद्धरामय्या यांना पर्याय असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न हरिप्रसाद यांच्याकडून केला जात आहे.

मुख्यमंत्री कसा बदलायचा याबाबत माहिती आहे- हरिप्रसाद

साधारण महिन्याभरापासून हरिप्रसाद हे सिद्धरामय्या यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मी आतापर्यंत पाच राज्यांचे मुख्यमंत्री निवडलेले आहेत. ओबीसी समाजाचे नेते असलेल्या भूपेश बघेल यांनादेखील छत्तीसगडचे मुख्यमंत्री मीच केले. मला एखाद्याला मुख्यमंत्री कसे बनवायचे आणि एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री कसा बदलायचा याबाबत माहिती आहे, असे विधान केले होते.

हुब्लॉट घड्याळीचा दाखला देत सिद्धरामय्या यांच्यावर टीका

गेल्या आठवड्यात त्यांनी इडिगा, बिल्लावा, नामधारी अशा ओबीसी जातींच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सिद्धरामय्या यांना लक्ष्य केले होते. जे लोक हुब्लॉट कंपनीचे घड्याळ घालतात ते समाजवादी असू शकत नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती. २०१६ साली मुख्यमंत्री असताना सिद्धरामय्या याच हुब्लॉट घड्याळामुळे चर्चेत आले होते. हे घड्याळ ४० लाख रुपयांचे आहे, असा दावा तेव्हा करण्यात आला होता. वाद निर्माण झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी ते घड्याळ राज्याची संपत्ती म्हणून घोषित केले होते. तसेच ते घड्याळ विधानसभा सचिवालयाकडे जमा केले होते. हाच मुद्दा घेऊन हरिप्रसाद यांनी सिद्धरामय्यांवर त्यांचे नाव न घेता टीका केली.

परमेश्वरा यांना मुख्यमंत्री करायला हवे होते- हरिप्रसाद

यावेळी काँग्रेसचे नेते जी परमेश्वरा यांचादेखील त्यांनी उल्लेख केला. राज्याचे गृहमंत्री आणि दलित नेते परमेश्वरा यांचे डिमोशन करण्यात आले, असे हरिप्रसाद म्हणाले. “गेल्या ७५ वर्षांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर एक दलित नेता असावा अशी मागणी केली जाते. परमेश्वरा हे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री करायला हवे होते. ते याआधी उपमुख्यमंत्री होते. मात्र, आता त्यांना कमी महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. आम्ही हे मान्य करू शकत नाही,” असेही हरिप्रसाद म्हणाले.

हरिप्रसाद यांनी माझे नाव घेतले का- सिद्धरामय्या

दरम्यान, हरिप्रसाद यांच्या टीकेवर सिद्धरामय्या यांना विचारण्यात आले. मात्र, त्यांनी या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले. हरिप्रसाद यांनी माझे थेट नाव घेतलेले आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सोमवारी हरिप्रसाद यांनी त्यांनी केलेल्या विधानांवर अधिक स्पष्टीकरण दिले. मी केलेल्या विधानाची मदत घेऊन आमच्या पक्षात फूट पडलेली आहे, असा अर्थ कोणीही काढू नये. आमच्या पक्षात लोकशाही आहे. आम्ही आमचे मत व्यक्त करू शकतो, असे हरिप्रसाद म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka congress leader b k hariprasad criticizes cm siddaramaiah prd
Show comments