कर्नाटक विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. येथे येत्या १० मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तसेच भाजपाने कंबर कसली असून आपापल्या उमेदवारांचीही यादी या दोन्ही पक्षांनी जाहीर केली आहे. बीएस येडियुरप्पा यांच्या कथित नाराजीमुळे भाजपाला आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब झाला, असे म्हटले जात होते. मात्र शेवटी भाजपाने ही यादी जाहीर केली असून यामध्ये एकूण १८९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
एकूण १८९ जागांसाठी उमेदवारांची घोषणा
आपल्या पहिल्या यादीत भाजपाने एकूण १८९ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या पहिल्या यादीत एकूण ५२ नवे चेहरे आहेत. तर उर्वरित ९६ विद्यमान आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना (सध्या विधानसभेत भाजापचे ११६ आमदार आहेत.) तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये २०१९ साली काँग्रेस आणि जेडएस पक्षांना सोडून आलेल्या १२ आमदारांचाही समावेश आहे. भाजपाने आपल्या पहिल्या यादीत विद्यमान ९ आमदारांचे तिकीट कापले आहे. आणखी ११ आमदारांचे भविष्य टांगणीला आहे. विद्यमान आमदारांचे पहिल्या यादीत नाव न आलेल्यांमध्ये जगदीश शेट्टर, केएस इश्वरप्पा, एसए रामदास, एमपी कुमारस्वामी, नेगरी ओलेकर, मादाल विरुपक्षा अशा आमदारांचा समावेश. यामध्ये दोन आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
एकाही मुस्लीम आणि ख्रिश्चन उमेदवाराला तिकीट नाही
नव्याने संधी दिलेल्या उमेदवारांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. भाजपा उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण आठ महिला उमेदवार आहेत. काँग्रेसने पहिल्या यादीत सात महिलांना उमेदवारी दिली होती. भाजपाने अद्याप एकाही मुस्लीम आणि ख्रिश्चन उमेदवाराला तिकीट दिलेले नाही. तर काँग्रेसने एकूण ११ मुस्लीम तर २ ख्रिश्चनांना तिकीट दिले आहे.
येडियुरप्पा यांच्या १२ कट्टर समर्थकांना उमेदवारी
भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत एकूण ५१ लिंगायत समाजाच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. २०१८ साली भाजपाने ५५ जागांवर लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले होते. ही निवडणूक लिंगायत समाजाचे नेते बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वात लढण्यात आली होती. विशेष म्हणजे भाजपाच्या पहिल्या यादीत येडियुरप्पा यांच्या १२ कट्टर समर्थकांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय युजवेंद्र यांच्यासह काँग्रेस आणि जेडीएसकडून प्रलोभन देण्यात आलेल्या १४ लोकांनाही (यामध्ये १२ आमदारांचा समावेश आहे.) भाजपाने यावेळी तिकीट दिले आहे.
काँग्रेसकडून आतापर्यंत ४२ लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट
काँग्रेसने आपल्या १६६ उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसने आतापर्यंत ४२ लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. २०१८ साली भाजपाने ४३ लिंगायत समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले होते. भाजपाने या निवडणुकीसाठी ४१ तर काँग्रेसने ३३ वोक्कालिगा समाजाच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे.
पक्षावर वर्चस्व कायम ठेवण्याचा येडियुरप्पा यांचा प्रयत्न
येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून निवृत्ती जाहीर केलेली आहे. मात्र आपल्या मर्जीच्या जास्तीत जास्त नेत्यांना तिकीट देऊन पक्षावर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. यामध्ये ते काहीसे यशस्वी झाले आहेत. याच कारणामुळे बुधवारी येडियुरप्पा यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. जास्तीत जास्त पाच ते सहा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाईल, असे येडियुरप्पा यांच्याकडून सांगितले जात होते. तर एकूण ३० विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाणार नाही, अशी चर्चा भाजपाच्या वर्तुळात रंगली होती.
येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना तिकीट
आपल्या पुत्राला तिकीट मिळावे यासाठी येडियुरप्पा यांच्याकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता. विजयेंद्र यांना काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात वरुणा या मतदारसंघातून उभे करावे, असे मत भाजपाचे होते. मात्र त्याला येडियुरप्पा यांचा विरोध होता. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्याविरोधात व्ही सोमन्ना यांना तिकीट देण्यात आले. तर विजयेद्र यांना दुसऱ्या जागेवर संधी देण्यात आली. यासह सिद्दू सावादी, सुरेश गौडा, एमपी रेणुकाचार्य, तामेश गोवडा, सीके राममुर्ती, बीपी हरिश, सप्तगिरी गौडा या येडियुरप्पा यांच्या समर्थकांना तिकीट मिळाले आहे.
आमदारांच्या मतदारसंघात विकासामांवर भर दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने अगोदरपासून चोख नियोजन केलेले आहे. भाजपा आमदारांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी भाजपाने भरघोस निधी दिलेला आहे. काँग्रेस तसेच जेडीएस पक्षाच्या तिकिटावर आमदाराकी मिळवलेले आणि आता भाजपाचे तिकीट मिळालेल्या १४ आमदारांच्या मतदारसंघातही भाजपाने निधीवाटप केलेला आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार काटील यांनी फेब्रुवारी महिन्यात भाष्य केले होते. भाजपा सरकारने एकूण एक हजार कोटी रुपये दिलेले आहेत. या निधीच्या माध्यमातून भाजपा आमदारांच्या मतदारसंघांत विकासकामे केली जातील, असे काटील म्हणाले होते.