कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. येथे १० मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र भाजपाने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. भाजपामधील अंतर्गत नाराजी आणि धुसफुसीमुळे यास विंलब होत असल्याचे म्हटले जात आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीमध्ये भाजपाची तीन दिवसांपासून बैठक सुरू होती. मात्र भाजपाचे कर्नाटकमधील बडे नेते बीएस येडियुरप्पा दिल्लीमधून बंगळुरूला परतल्यामुळे भाजपामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा दावा केला जात आहे. याच कारणामुळे भाजपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्याचे म्हटले जात आहे.
दिल्लीमध्ये नेमके काय घडले?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कर्नाटकमधील भाजपाच्या नेत्यांची शनिवारपासून दिल्लीमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार होती. मात्र बीएस येडियुरप्पा हे अचानकपणे बंगळुरूला परतल्यामुळे दिल्लीमध्ये उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले नसल्याचा दावा केला जात आहे. भाजपाने मात्र हे वृत्त फेटाळले आहे. भाजपामध्ये सर्व काही आलबेल आहे. येडियुरप्पा नाराज नाहीत. त्यांनी सर्व बैठकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला, तसेच उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली, असे भाजपाने सांगितले आहे. दिल्लीमधील बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, येडियुरप्पा तसेच दिल्लीमधील नेत्यांचा समावेश होता.
हेही वाचा >> Karnataka : निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचे मंत्री अडचणीत; द्वेषपूर्ण भाषण आणि साडीवाटप प्रकरणात अटकेची शक्यता!
बीएस येडियुरप्पा नाराज का आहेत?
बीएस येडियुरप्पा सध्या नाराज असल्याचे म्हटले जात आहे. शनिवारपासून भाजपाचे वरिष्ठ नेते उमेदवारांची नावे निश्चित करण्यावर चर्चा करत होते. आपल्या मर्जीच्या कमीत कमी ३० उमेदवारांना तिकीट द्यावे, असा आग्रह येडियुरप्पा यांचा आहे. या प्रत्येक उमेदवाराच्या विजयाचे आश्वासन येडियुरप्पा यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावर एकमत न झाल्यामुळे ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
भाजपाने विजयेंद्र यांना उमेदवारी नाकारली?
या उमेदवारांमध्ये येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांचाही समावेश आहे. बीएस येडियुरप्पा यांनी २०२२ साली जुलै महिन्यात निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे आपल्या शिकारीपुरा या मतदारसंघातून ते आपला मुलगा बीवाय विजयेंद्र याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपाने विजयेंद्र यांना उमेदवारी नाकारल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे येडियुरप्पा नाराज असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा >> महात्मा जोतिबा फुले यांना वंदन करत सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षाविरोधातच फुंकले रणशिंग
उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात
भाजपाने मात्र येडियुरप्पा यांच्या नाराजीचे वृत्त फेटाळले आहे. भाजपाच्या दिल्लीमधील बैठकीला प्रल्हाद जोशी उपस्थित होते. त्यामुळे येडियुरप्पा यांच्या कथित नाराजीवर जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या बैठकीत येडियुरप्पा यांनी अनेक सूचना केल्या. मात्र महत्त्वाच्या कामामुळे त्यांना बंगळुरूला जावे लागले. ते गेल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही महत्त्वाची चर्चा केली. उमेदवारांची यादी अंतिम टप्प्यात आहे. अमित शाह सध्या दिल्लीमध्ये नसल्यामुळे त्यांच्याशी उमेदवारांच्या यादीवर चर्चा होऊ शकली नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा यांच्या परवानगीने ही यादी प्रसिद्ध केली जाईल,” असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
येडियुरप्पा नाराज नाहीत- बोम्मई
बसवराज बोम्मई यांनीदेखील येडियुरप्पा यांच्या कथित नाराजीवर भाष्य केले आहे. “बीएस येडियुरप्पा यांनी मागील तीन दिवसांमध्ये सर्व बैठकांमध्ये भाग घेतला. ते केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी अनेक प्रश्नांवर त्यांची मते मांडली. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालीच सर्व गोष्टी पार पडत आहे. त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जात आहेत,” अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी दिली आहे.
हेही वाचा >> मुख्यमंत्रीपदासाठी खरगेंचा आग्रह आणि शिवकुमारांची तिरकस खेळी
मी खूप खूप आनंदी आहे- येडियुरप्पा
बंगळुरूमध्ये परतल्यावर येडियुरप्पा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. आपण नाराज असल्याचे त्यांनी सांगितले होते. “मी खूप खूप आनंदी आहे. मी ज्या काही सूचना केल्या होत्या, त्या सर्व स्वीकारण्यात आल्या आहेत. आम्ही या निवडणुकीत पूर्ण बहुमताने विजयी होऊ, असा मला विश्वास आहे,” असे येडियुरप्पा म्हणाले.
लवकरच सर्व उमेदवारांची यादी जाहीर करणार
भाजपा आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार, असे विचारले असता प्रल्हाद जोशी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही सर्व २२४ जागांसाठी कोणाला उमेदवारी द्यावी, यावर विचार केला आहे. या चर्चेनंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. तसेच काही माहिती मागविण्यात आली आहे. उमेदवार निवडीबाबत कोणताही गोंधळ नाही. आम्ही लवकरच सर्व उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत. आम्हाला याबाबतीत खूप काळजी घ्यायची आहे. उमेदवार निवडीबाबत आमचे राष्ट्रीय नेते खूप काळजी घेत आहेत. ऐनवेळी काही बदल होतील,” असे प्रल्हाद जोशी म्हणाले.
दरम्यान, भाजपाने अद्याप एकाही उमदेवाराचे नाव जाहीर केलेले नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने २२४ पैकी आतापर्यंत ११६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाने ९३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.