कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने एकूण दोन याद्या प्रसिद्ध केल्या असून यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट नाकारले आहे. याच कारणामुळे भाजपामध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. अनेक नेत्यांनी भाजपाशी बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. तर काही नेत्यांनी तिकीट नाकारल्यामुळे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. कर्नाटचे माजी उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे बडे नेते लक्ष्मण सवदी यांनी तर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. साऊदी यांचा पक्षत्याग भाजपासाठी चांगलाच धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >> आंध्र प्रदेशमध्ये विकासकामांच्या मुद्द्यावरुन ‘सेल्फी वॉर’, जगनमोहन रेड्डी-चंद्राबाबू नायडू आमनेसामने!
लक्ष्मण सवदी कोण आहेत?
लक्ष्मण सवदी हे भापजपाचे विधान परिषदेतील आमदार आहेत. ते अथानी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले आहेत. मात्र २०१८ साली त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. (तेव्हा ते काँग्रेस पक्षात होते.) त्यांनी २०१९ साली भाजापमध्ये प्रवेश केला होता. ते कर्नाटकमधील भाजपाचे मोठे नेते होते. त्यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळलेला आहे. २०१९ ते २०२१ या काळात ते परिवहनमंत्री होते.
विधानसभेत पॉर्नोग्राफिक फिल्म पाहिल्याप्रकरणी वाद
२०१२ साली कर्नाटकच्या विधानसभेत पॉर्नोग्राफिक फिल्म पाहिल्याप्रकरणी लक्ष्मण सवदी आणि सीसी पाटील हे दोन नेते चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणामुळे कर्नाटकात चांगलाच राजकीय वाद रंगला होता. या प्रकरणामुळे पुढे सवदी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा >>कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार
सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार- शिवकुमार
दरम्यान, भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर सवदी लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती शिवकुमार यांनी दिली आहे.