कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. येथे येत्या १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा तसेच काँग्रेसने कसोशीने प्रयत्न केलेले आहेत. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रचार मोहिमांकडे सर्वांनीच लक्ष वेधले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी रोड शोद्वारे जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही नेत्यांनी दोन दिवस कसा प्रचार केला हे जाणून घेऊ या.
नरेंद्र मोदी यांनी शनिवार (६ मे) आणि रविवारी (७ मे) असे एकूण दोन दिवस कर्नाटकमध्ये रोड शो केले. या रोड शोमध्ये त्यांनी साधारण ३० किलोमीटरचे अंतर पार केले. तर राहुल गांधी यांनी रविवार (७ मे) आणि सोमवारी (८ मे) अशा एकूण दोन दिवस बसने, दुचाकीने प्रवास करून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महिला, तरुण यांच्याशी गप्पा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
हेही वाचा >> Rajasthan : सोनिया गांधी नाही वसुंधरा राजे आहेत गेहलोत यांच्या खऱ्या नेत्या; सचिन पायलट यांची टीका
रोड शोमुळे अनेक रस्ते झाले ब्लॉक
शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेपीनगर ते मल्लेश्वरम असा एकूण २६ किमी अंतराचा रोड शो केला. तर रविवारी त्यांनी थिप्पासांद्रा रोड ते ट्रिनिटी सर्कलपर्यंत ६.५ किमीपर्यंत रोड शो केला. या रोड शोदरम्यान लोकांनी गर्दी केली होती. मात्र अनेक ठिकाणी रस्ते ब्लॉक झाले होते. त्यामुळे अनेकांनी नाराजीही व्यक्त केली. शनिवारी चार्टर्ड अकाऊंटटची परीक्षा होती. तसेच नॅशनल इलिजिबलिटी टेस्टही होती. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते ब्लॉक झाल्यामुळे त्याचा त्रास विद्यार्थांना झाला. मोदींच्या रोड शोसाठी बंगळुरु पोलिसांनी अनेक ठिकाणचे रस्ते ब्लॉक केले होते. यादरम्यान अनेक ठिकाणी पाऊसही झाला होता. त्यामुळे विद्यार्थी, चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाले.
राहुल गांधी यांचा बसने प्रवास
रविवारी राहुल गांधी यांनी औपचारिक प्रचार टाळत कामगारांशी संवाद साधला. तसेच डुंझो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीट अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांशीही संवाद साधला. डिलिव्हरी बॉयच्या मागे बसून राहुल गांधी यांनी काही किमी प्रवास केला. या प्रवासादरम्यान राहुल गांधी यांनी बेरोजगारी, महागाई तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, असे काँग्रेससे म्हणणे आहे.
हेही वाचा >> पश्चिम बंगालमध्ये ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी, भाजपा आक्रमक; ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन यांच्यावर सडकून टीका!
राहुल गांधी यांनी साधला महिला प्रवाशांशी संवाद
सोमवारी राहुल गांधी यांनी कनिंगहॅम रस्त्यावर थांबून कॉफी घेतली. यावेळी रस्त्यावर उभे असलेल्या महिला तसेच महिला कॉलेजच्या विद्यार्थिनींशी संवास साधला. पुढे त्यांनी बीएमटीसी बसमधूनही प्रवास केला. यावेळी प्रवासादरम्यान त्यांनी महिला प्रवाशांसी संवाद साधला. महिलांना कर्नाटकसंदर्भात काय हवे आहे, हे राहुल गांधी यांनी जाणून घेतले. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिला प्रवाशांसाठी मोफत प्रवासाचे आश्वासन दिलेले आहे.
राहुल गांधी यांच्यामुळे कोठेही रस्ते ब्लॉक झाले नाहीत
काँग्रेस नेत्यांच्या दाव्यानुसार प्रवासातील महिलांनी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, महागाई, घरातील खर्च याविषयी राहुल गांधी यांना सांगितले. पुढे राहुल गांधी लिंगराजपुरम येथे उतरले. तेथेदेखील त्यांनी बसस्थानकावर उभे असलेल्या काही महिलांशी संवाद साधला. राहुल गांधी यांच्या या चर्चेविषयी काँग्रेसच्या नेत्यांनी सविस्तर सांगितले. “राहुल गांधी यांच्यामुळे कोठेही रस्ते ब्लॉक झाले नाहीत. तसेच कोठेही वाहतुकीचा खोळंबा उडाला नाही. राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम नियोजित नव्हता,” असे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
हेही वाचा >> कर्नाटकच्या निवडणूक रणांगणात राज्यातील नेत्यांची धुळवड
भाजपा, काँग्रेसच्या हाती काय लागणार?
दरम्यान बंगळुरू शहर परिसरात एकूण २८ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. भाजपाने या भागात २०१८, २०१३ आणि २००८ या सालच्या निवडणुकीत अनुक्रमे ११, १२ आणि १७ जागांवर विजय मिळवलेला आहे. तर काँग्रेसने अनुक्रमे १५, १३ आणि १० जागांवर विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांनी केलेल्या प्रचारामुळे त्यांच्या पक्षांच्या हाती नेमके काय लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.