कर्नाटकमध्ये सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र येथे भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपाला येथे अवघ्या ६६ जागांवर समाधान मानावे लागले. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने प्रचाराच्या मैदानात दिग्गजांना उतरवले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी जवळपास प्रत्येक ठिकाणी ‘डबल इंजिन’ सरकार असेल तर विकास वेगाने होतो, असा दावा करत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करत होते. याच पार्श्वभूमीवर मोदींच्या रॅलीमुळे भाजपाला फायदा झाला का? मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला का? याचा घेतलेला आढावा..
हेही वाचा >>Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी, आप पक्षाला मतदारांनी नाकारलं… ‘नोटा’पेक्षा मिळाली कमी मतं!
काँग्रेसची भिस्त नरेंद्र मोदी यांच्यावर
कर्नाटकमधील बसवराज बोम्मई सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपाने या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवाराचे नाव घोषित करण्याचे टाळले. तसेच भाजपाच्या प्रचाराची सर्व भिस्त नरेंद्र मोदी, अमित शाह अशा दिल्लीतील नेत्यांवरच होती. भाजपाने मोदी यांनाच कर्नाटकात प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यांनी आपल्या प्रचारात नेहमीप्रमाणे काँग्रेस, गांधी घराण्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांवरही बोट ठेवले. आम्ही सत्तेत आल्यास बजरंग दल तसेच पीएफआय अशा संघटनांवर बंदी घालू, असे काँग्रेसने आश्वासन दिले होते. मोदी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जवळजवळ प्रत्येक सभेमध्ये हाच मुद्दा उपस्थित करत. काँग्रेस बजरंगबलीच्या भक्तांना तुरुंगात टाकू पाहात आहे, असा गंभीर आरोप मोदी यांच्याकडून केला जात होता. मात्र मोदी यांच्या या रणनीतीचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : ७ टक्के मते आणि ७० जागांचा फरक! ‘या’ कारणामुळे काँग्रेसचा विजय; पण भाजपाला कोणत्या प्रदेशात फटका? जाणून घ्या…
नरेंद्र मोदी यांच्या रॅली, रोड शोचा काय फायदा झाला
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मोदी यांनी कर्नाटकमध्ये २० रॅली आणि रोड शो केले. यामध्ये बंगळुरू येथील तीन रॅलींचा समावेश आहे. बंगळुरू येथील तीन रॅली वगळता मोदी यांनी ज्या १७ ठिकाणी रॅलीज काढल्या त्यापैकी भाजपाचा फक्त ५ जागांवर विजय झाला. काँग्रेसचा एकूण १३ जागांवर तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचा दोन जागांवर विजय झाला. मोदी यांच्या रॅली आणि रोड शो हे फक्त एका मतदारसंघाला समोर ठेवून आयोजित करण्यात आले नव्हते, असे भाजपाकडून सांगितले जाते. भाजपाचा हा तर्क लक्षात घेतल्यास मोदी यांनी ज्या ठिकाणी रॅली आणि रोड शोचे आयोजन केले त्या जागेच्या प्रभावक्षेत्रात एकूण ४५ मतदारसंघ येतात. या सर्व ४५ मतदारसंघांचा विचार करायचा झाल्यास तसेच भाजपाच्या २०१८ सालच्या निवडणुकीतील कामगिरीशी तुलना केल्यास भाजपाने या निवडणुकीत पाच जागा गमावल्या आहेत. २०१८ साली भाजपाने या ४५ मतदारसंघांपैकी २३ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत या ४५ मतदारसंघांमध्ये भाजपाचा १८ जागांवर विजय झाला आहे. भाजपाने गमावलेल्या एकूण पाच जागांपैकी तीन जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे.
हेही वाचा >> जनता दलाच्या पिछेहाटीबरोबरच देवेगौडा कुटुंबातच पराभवांची मालिका सुरू
कोणत्या जागेवर भाजपाचा पराभव, कोणत्या जागेवर विजय?
कर्नाटकमधील शिवमोग्गा ग्रामीण, बेळगावातील कुडाची, कोलार, विजयनगर, चित्रदुर्ग, सिंधानूर, कलबुर्गी, कारवार, कित्तूर, नंजनगुड, छन्नापटना, बजामी, हवेरी या मतदारसंघांत मोदी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच जागांवर भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. तर बिदरमधील हुमनाबाद, बिजापूर शहर, हसान येथील बेलूर, मुदाबीद्री, तुमाकुरू ग्रामीण या जागांवरही मोदी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. येथे मात्र मोदींच्या रॅलीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या जागांवर भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला.