कर्नाटक विधानसभेत बहुमत मिळाल्यावर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात लढत असली तरी आतापर्यंत मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्या नावावर सहमती होऊ शकते. तसे झाल्यास खरगे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छापूर्ती होऊ शकते.
कर्नाटक विधानसभेत विक्रमी नऊ वेळा निवडून आलेल्या खरगे यांना मुख्यमंत्रीपद कधीच मिळू शकले नाही. १९९९ मध्ये पक्षाला सत्ता मिळाली तेव्हा एस. एम. कृष्णा यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले. २००४ मध्ये काँग्रेस-जनता दल आघाडीचे धरमसिंह हे मुख्यमंत्री झाले. २०१३ मध्ये सत्ता मिळाली तेव्हा खरगे हे केंद्रात मंत्रिपदी होते. तेव्हा सिद्धरामय्या यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली होती.
हेही वाचा >>> Karnataka Election Results 2023 : भाजपचे प्रचारातील मुद्दे मतदारांना भावले नाहीत
पक्षात आपण ज्येष्ठ असूनही मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्याची सल खरगे यांच्या मनात कायम आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी लोकसभेत काँग्रेस पक्षाचे गटनेतेपद भूषविले होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत खरगे पराभूत झाले पण कालांतराने त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. राज्यसभेत निवडून आल्यावर खरगे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविण्यात आले. गेल्या वर्षाअखेर काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तेव्हा अशोक गेहलोत यांनी ऐनवेळी नेतृत्वालाच आव्हान दिले. शेवटी खरगे यांना संधी देण्यात आली.
कर्नाटकात विविध मंत्रिपदे, केंद्रात मंत्रिपद, लोकसभेचे गटनेते, राज्यसभेेचे विरोधी पक्षनेतेपद आणि आता काँग्रेस अध्यक्षपद अशी विविध पदे खरगे यांनी भूषविली आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण झालेली नाही.
हेही वाचा >>> Karnataka Election Results 2023: मोदी-शहांच्या झंझावाती प्रचारानंतरही मतदारांची भाजपकडे पाठ!
मुख्यमंत्रीपदावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात प्रचाराच्या सुरुवातीला वाद झाला होता. शिवकुमार कधी मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असे विधान खरगे यांनी केले होते. तेव्हा सिद्धरामय्या यांच्यावर कुरघोडी करण्याकरिताच शिवकुमार यांनी खरगे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवावे, अशी सूचना केली होती. काँग्रेस पक्षाला बहुमत मिळताच सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळेत खरगे हा पर्याय असू शकतो. तसे झाल्यास काँग्रेसला नवा अध्यक्ष नेमावा लागेल.