Karnataka Assembly Elections 2023 : महाविद्यालयीन परिसरात हिजाब परिधान करण्यासाठी विरोध करणारे यशपाल सुवर्णा यांना भाजपाने उडीपी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उडीपी मतदारसंघ हा संवेदनशील मानला जातो. मंगळवारी (दि. ११ एप्रिल) भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली. या वेळी उडीपीमधील पक्षाचे विद्यमान आमदार रघपथी भट यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी सुवर्णा यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाचे नेते आणि तीन वेळा उडीपीमधून विजय मिळवलेल्या भट यांना खात्री होती की, पुन्हा त्यांनाच तिकीट दिले जाईल. मात्र या वेळी किनारपट्टी क्षेत्रातील लोकांची मागणी होती की, ओबीसी समाजातील व्यक्तीला तिकीट देण्यात यावे, ज्याचा तळातील लोकांशी चांगला संपर्क असेल. सुवर्णा हे ओबीसीमधील मोगाविरा जातीतून येतात. त्यांनी हिजाब प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यभरात त्यांची ओळख झाली होती.
भाजपा मलाच तिकीट देईल, अशी खात्री भट यांना मंगळवारी सकाळपर्यंत होती. पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याचा सन्मान पक्ष करीलच. जर पक्षाने तिकीट दिले नाही, तर पुढची भूमिका जाहीर करीन, अशी प्रतिक्रिया भट यांनी मंगळवारी सकाळी दिली होती. भाजपाच्या दिल्ली येथील मुख्यालयातून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर भट यांना धक्का बसला. तरीही त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. “मी पक्षासाठी काम केले आणि पक्षाने माझ्या कामाची दखल घेतलेली आहे,” अशी प्रतिक्रिया भट यांनी दिली. तर दुसऱ्या बाजूला सुवर्णा यांनी आपलाच विजय होणार, याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. “भट यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण असले तरी पक्ष हा व्यक्तिगत महत्त्वकांक्षेपेक्षा मोठा आहे. एकदा तिकीट जाहीर झाले तर प्रत्येकाने पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम केले पाहिजे आणि तसे उडीपीमधील कार्यकर्ते करतील,” याचा मला विश्वास असल्याचे सुवर्णा यांनी म्हटले आहे.
यशपाल सुवर्णा कोण आहेत?
‘उडीपी सरकारी पीयू गर्ल्स कॉलेज’च्या विकास समितीचे उपाध्यक्ष म्हणून सुवर्णा काम करीत आहेत. हे कॉलेज हिजाब वादाच्या केंद्रस्थानी होते. सुवर्णा यांनी हिजाब बंदीबाबत सुरुवातीपासून उघड भूमिका घेतलेली होती. हिजाब बंदीच्या विरोधात न्यायालयात गेलेल्या सहा मुलींना सुवर्णा यांनी दहशतवादी असल्याचे संबोधले होते. तसेच “मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. ज्या लोकांना या देशाचा कायदा मान्य नाही, ते सर्व लोक देशद्रोही आहेत,” असेही त्यांनी वारंवार म्हटलेले आहे. सुवर्णा यांनी हिजाबचा विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांना केशरी शाल घेऊन महाविद्यालयात पाठविले होते. त्यांच्या या पायंड्याचे लोन नंतर राज्यभर पसरले होते.
सुवर्णा यांचे वडील बँकेत काम करीत होते. मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. उडीपीमध्ये त्यांचा व्यवसाय चांगलाच विस्तारलेला आहे. मासेमारी व्यवसायाशी निगडित असलेल्या मोगाविरा जातीचे नेते म्हणून ४५ वर्षीय सुवर्णा गेल्या काही वर्षांपासून पुढे आले. ज्याचे उडीपीच्या सागरी किनारपट्टीवर नियंत्रण असेल त्याचेच संपूर्ण उडीपीवर बस्तान बसेल, असे वक्तव्य त्यांनी अनेकदा केले होते. सुवर्णा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आता त्यांचे हे वक्तव्य खरे ठरले आहे. मागच्या १३ वर्षांपासून ते दक्षिण कन्नाडा आणि उडीपी जिल्हा मासळी बाजार सहकार संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
सागरी किनारपट्टी असलेल्या या जिल्ह्यात जातीपेक्षाही धर्माचे मुद्दे अधिक टोकदार आहेत. त्यामुळे सुवर्णा यांचा भाजपाकडे असलेला ओढा हा नैसर्गिक होता. तसेच त्यांच्या कुटुंबाचेही पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंध होते. १९८० च्या दशकात सुवर्णा यांचे काका रघुनाथ हे संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी सूरथकाल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला.
महाविद्यालयात असताना सुवर्णा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी बजरंग दलासाठीही काम केले. तरुणपणात त्यांनी गोरक्षक म्हणून काम करीत असताना बरेच नाव मिळवले होते. २००५ साली गोमांसाची तस्करी करणाऱ्या बाप-लेकाला विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्यामुळे सुवर्णा यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर विशेष सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले होते.