संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकमध्ये मात्र एका सेक्स व्हिडीओमुळे राजकारण तापले आहे. होलेनारसीपुरामधील एका महिलेने रविवारी (२८ एप्रिल) देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मुलगा एच. डी. रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, तपास सुरू केला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. नेमके काय घडले आहे? कोणते आरोप करण्यात आले आहेत? आणि त्याचा राजकारणावर काय परिणाम होतो आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी पंतप्रधानांच्या मुलावर आणि नातवावर आरोप

कर्नाटकातील हसन मतदारसंघामध्ये प्रज्वल रेवण्णा निवडणूक लढवीत आहेत. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच शुक्रवारी (२६ एप्रिल) या मतदारसंघामध्ये मतदान होणार होते. त्यापूर्वी तीन दिवस आधी प्रज्वल यांचा कथित सहभाग असल्याचा सेक्स व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. या व्हिडीओमध्ये कथितरीत्या प्रज्वल त्या महिलेला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडत असल्याचे दिसून येते. द इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, यातील बहुतेक व्हिडीओ क्लिप्स हसन किंवा होलेनारसीपुरामध्ये चित्रित केल्या गेल्या आहेत. प्रज्वल रेवण्णा आणि त्यांचे वडील एच. डी. रेवण्णा यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप या महिलेने होलेनारसीपुरा पोलिसांकडे केला आहे. या लैंगिक छळाचे व्हिडीओ प्रसारित झाल्याचे पाहिल्यानंतर आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली असल्याचे तिने सांगितले आहे.

तिच्यावर २०१९ ते २०२२ दरम्यान हे अत्याचार झाले असल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने पोलिसांना सांगितले आहे की, ती रेवण्णा यांची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे. २०११ मध्ये घरकाम करण्यासाठी तिला बोलावण्यात आले. २०१५ साली एका हॉस्टेलमध्ये स्वयंपाकी म्हणून नोकरी मिळवून देण्यात रेवण्णा यांनी तिला मदत केली. त्यानंतर २०१९ मध्ये ती पुन्हा रेवण्णा यांच्या घरी काम करण्यासाठी रुजू झाली. एफआयआरमध्ये त्या महिलेने म्हटले आहे, “घरातील आणखी सहा कर्मचारीदेखील प्रज्वल यांना घाबरून असायचे. पुरुष कर्मचारीदेखील आम्हाला रेवण्णा आणि प्रज्वल यांच्यापासून सावध राहण्यास सांगायचे. रेवण्णा यांची पत्नी भवानी जेव्हा घरी नसायची तेव्हा ते मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे आणि माझे कपडे काढून लैंगिक शोषण करायचे.

“मी स्वयंपाकघरात काम करायचे तेव्हा प्रज्वल मला पाठीमागे नकोसा स्पर्श करायचे. इतर कर्मचाऱ्यांना सांगून ते माझ्या मुलीला तेल मसाज करण्यासाठीही बोलवायचे. ते माझ्या मुलीशी व्हिडीओ कॉल करून अश्लीलपणे बोलायचे. या सगळ्या अत्याचाराला कंटाळून मी काम सोडले आणि रेवण्णा यांचा फोन नंबर ब्लॉक केला”, असेही तिने सांगितले. या महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रेवण्णा यांना आरोपी क्रमांक १; तर प्रज्वल यांना आरोपी क्रमांक २ ठरवले आहे.

विशेष तपास पथकाकडून तपास


ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्यामुळे राज्यातील राजकारणही तापले आहे. कर्नाटकमधील सिद्धरामैया सरकारने शनिवारी (२७ एप्रिल) या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली. मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी एक्सवर याबाबत म्हटले आहे, “प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडीओ प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. महिलेचा लैंगिक छळ झालेले काही व्हिडीओ हसन जिल्ह्यामध्ये प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने सरकारला पत्र लिहून या संदर्भात कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही कारवाई केली जात आहे.”

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (सेक्युलर) यांच्याकडून या प्रकरणासंदर्भात खुलासा मागितला आहे. हे दोन्हीही पक्ष या निवडणुकीमध्ये एकत्र लढत आहेत. शिवकुमार यांनी म्हटले आहे, “पंतप्रधान, बी. वाय. विजयेंद्र, शोबक्का, अशोक, कुमारण्णा व अश्वथ नारायण यांनी जनतेला उत्तर द्यायला हवे.”

जेडीएसने काय दिली प्रतिक्रिया?


या प्रकरणाला सुरुवात झाल्याबरोबर भाजपाने आपले अंग काढून घेतले आहे; तर जेडीएस पक्ष सारवासारव करण्याच्या पावित्र्यात आहे. भाजपाचे राज्यातील प्रवक्ते एस. प्रकाश यांनी म्हटले आहे, “पक्ष म्हणून आमचा यामध्ये काहीही संबंध नाही आणि आम्हाला त्या संदर्भात काही भाष्यही करायचे नाही.”

दुसरीकडे प्रज्वल रेवण्णा यांचे काका एच. डी. कुमारस्वामी यांनी यावरुन आपल्याच भावावर आणि पुतण्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “संपूर्ण कुटुंबाला यामध्ये दोषी धरु नका. ते आणि त्यांचे वडील एच. डी. देवेगौडा हे महिलांबाबत नेहमीच आदराने वागत आले आहेत. या संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. करावे तसे भरावे, अशी म्हण आहेच; काय निष्पन्न होते ते पाहू या. जर एखाद्याने चूक केली असेल, तर त्याला माफी देण्याचा विषय येत नाही. आधी या तपासातून काय निष्पन्न होते ते पाहू या, मग मी बोलेन,” असे ते म्हणाले.

काही वृत्तसंस्थांनी अशी माहिती दिली आहे की, प्रज्वल देश सोडून फरारी झाले आहेत. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार ते जर्मनीमध्ये आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने हे छेडछाड केलेले खोटे व्हिडीओ प्रसारित केले जात असल्याचा दावा प्रज्वल यांनी यापूर्वी केला आहे.

निवडणुकीवर काय होणार परिणाम?

विशेष म्हणजे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एका नेत्याने प्रज्वल रेवण्णा महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप यापूर्वीच केला होता. ‘न्यूज मिनीट’च्या बातमीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जी देवराजेगौडा यांनी ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना पत्र लिहून प्रज्वल यांना उमेदवारी देताना त्यांच्याबाबत सावध केले होते. त्यांनी असा दावा केला की, त्यांना एक पेन ड्राइव्ह मिळाला होता; ज्यामध्ये असे २,९७६ व्हिडीओ आहेत. यातील काही व्हिडीओंमध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. यातील महिलांना या व्हिडीओवरून ब्लॅकमेल करून पुन्हा लैंगिक शोषणासाठी भाग पाडले जात होते. हे व्हिडीओ आणि फोटो असलेला आणखी एक पेन ड्राइव्ह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोहोचला असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

कर्नाटकचा विचार करता, तिथे भाजपा आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाने युती केली आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे जेडीएस पक्षाचे प्रमुख आहेत. २०१९ पर्यंत संसदीय राजकारण केल्यानंतर आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ९१ व्या वर्षीही ते पक्षाच्या प्रचारात उतरले आहेत. याआधी काँग्रेसबरोबर युतीमध्ये असणारा हा पक्ष या निवडणुकीमध्ये भाजपाबरोबर गेला आहे. मात्र, कर्नाटकमधील २८ पैकी तीन जागांवर निवडणूक लढविणाऱ्या या पक्षासमोर आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. या सगळ्या प्रकरणाचा लोकसभा निवडणुकीवर कसा परिणाम होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka hd deve gowda grandson prajwal revanna sex scandal vsh