कर्नाटकात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रंगात येताना दिसत आहे. काँग्रेस सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे तर भाजपा सत्ता कायम ठेवण्यासाठी जोर लावणार आहे. त्यात भाजपासमोर एक नवीन आव्हान निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत, कारण माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते बी एस येडियुरप्पा हे पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांमधून काहीसे बाजूला झाल्यासारखे वाटत आहे. यावरून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटका भाजपात येडियुरप्पा काहीसे बाजूला झाल्याचे दिसत असताना, मुख्यमंत्री बसवरा बोम्मई त्यांची जागा भरून काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून येत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही बोलले जात असताना, आपल्यात कोणत्याच प्रकारचे मतभेद नाहीत असे दोघांकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे.

राजकीय वर्तुळात अशा चर्चा सुरू होत्या की, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांना पुन्हा एकदा पक्षाकडून दुर्लक्षित केलं जात आहे. त्यांना स्वत:हून पक्षाच्या विशेष अभियानांवर जाण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे येडियुरप्पा नाराज आहेत आणि याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटू शकतात. जे भाजपासाठी धोक्याची घंटा असू शकते.

तर दुसरीकडे बोम्मई जनतेला मोठी आश्वासनं देताना दिसत आहेत. यामध्ये विविध प्रवर्गासाठी नोकरी व शिक्षणात आरक्षणांसह अन्य गोष्टींचाही समावेश दिसत आहे. मात्र बोम्मई आरक्षणाचे आश्वासन नेमकं कसं पूर्ण करतील याबाबत अद्याप तरी काहीच स्पष्टता नाही. मात्र, लिंगायत समुदायातील प्रमुख उप-संप्रदाय, वोक्कालिगा आणि दलित, आदिवासी समुदायांच्या मतांवर कर्नाटकातील भाजपाचे भवितव्य बरेचसे अवलंबून असल्याचेही दिसत आहे. कर्नाटकात पुढील वर्षांच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार असल्यानेच भाजप सरकारने अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात वाढ केली. कर्नाटकातील आरक्षण आता ५६ टक्के झाले.

भाजपाने दिग्गज लिंगायत नेते येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर आपल्या संसदीय बोर्डात समावेश केला आहे. मात्र तरीही त्यांच्या समर्थक नेत्यांमध्ये पक्षाकडून दुर्लक्षित केले जात असल्याची भावना दिसत आहे. त्यामुळे भाजपासमोर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चित्र बदलण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka in the face of the assembly elections a challenge for the bjp to remove yeddyurappas displeasure msr