महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून अलीकडे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीनंतर अमित शाह यांनी न्यायालयात प्रश्न सुटेपर्यंत दोन्ही राज्यांनी भूभागांवर दावे करू नयेत, असा सल्ला दिला होता. मात्र, आता कर्नाटक सरकारने घेतलेल्या भूमिकेवरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, याबाबत कर्नाटक विधानसभा आणि विधापरिषद या दोन्ही सभागृहात ठराव मांडण्यात येणार आहे. ‘‘सीमाप्रश्न संपलेला आहे. महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याआधीही मंजूर करण्यात आले आहेत. याच भूमिकेचा पुनरूच्चार करणारा ठराव पुन्हा मांडण्यात येईल’’, असे बोम्मईंनी म्हटलं.
हेही वाचा : “मैं नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान…”, ‘भारत जोडो’ यात्रेबाबत राहुल गांधींचं विधान
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी बोम्मईंच्या ठरावाला पाठिंबा दर्शवला. “सीमाभागाचा प्रश्न महाराज आयोगानुसार निकाली निघाला आहे. तरीही, महाराष्ट्रातील राजकारण्यांनी हा प्रश्न उकरून काढला,” असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे.
हेही वाचा : अशोक गेहलोत यांची मोठी घोषणा! राजस्थानमध्ये गरिबांना ५०० रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर
महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात जाण्याचा प्रयत्न केल्यावरून बोम्मईंनी टीका केली आहे. “कर्नाटकात जबरदस्तीने घुसून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे योग्य नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यावर ठाम राहू. आम्ही महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही,” असे बोम्मईंनी पुन्हा सांगितलं.