कर्नाटकमध्ये भाजपातील मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी भाजपाचे वरिष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र तथा आमदार बी. वाय. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून; तर आर. अशोका यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींमुळे कर्नाटक भाजपामध्ये दुफळी निर्माण झाली. अनेक नेत्यांनी विजयेंद्र, तसेच अशोका यांच्या निवडीला विरोध केला. असे असताना आता कर्नाटकमधील हिवाळी अधिवेशनात भाजपातील मतभेद समोर आले आहेत.
काही आमदारांचा सभात्याग, काही आमदारांची सभागृहातच घोषणाबाजी
भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे सदस्य पृथ्वी सिंह यांच्यावर काँग्रेसचे आमदार चन्नाराज हत्तीहोली, तसेच त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. याच हल्ल्याचे पडसाद कर्नाटकच्या विधिमंडळात उमटले. भाजपाने या हल्ल्याद्वारे काँग्रेस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला; मात्र सभागृहात भाजपामध्ये दोन मतप्रवाह दिसले. विरोधी पक्षनेते अशोका यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी सभागृहाचा त्याग केला; तर विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी सभागृतात राहून घोषणाबाजी करण्याचा मार्ग निवडला. सभागृहाचा त्याग करणाऱ्यांमध्ये अशोका यांच्यासह विजयेंद्र, येडियुरप्पा यांचे विरोधक असलेले सी. एम. अश्वथ नारायण, एस. सुरेश कुमार आदी नेत्यांचा समावेश होता. तर विजयेंद्र आणि एस. आर. विश्वनाथ, तसेच अभय पाटील यांसारख्या नेत्यांनी सभागृहातच थांबून घोषणाबाजी केली.
“… म्हणून सभागृहाचा त्याग केला”
हा गोंधळ समोर आल्यानंतर अशोका, विजयेंद्र, यत्नल, तसेच अन्य नेत्यांनी बंद दाराआड एक बैठक घेतली. सभागृहात उत्तर कर्नाटकमधील दुष्काळावर सभागृहातील चर्चा बाधित होऊ नये म्हणून आम्ही सभागृहाचा त्याग केला, असे अशोका यांनी या बैठकीत सांगितले. तर सभागृहातच राहून विरोध करणे हा सर्वोत्तम पर्याय होता, अशी भूमिका भाजपाचे नेते सुनील कुमार यांनी मांडली.
विजयेंद्र, अशोका यांच्या निवडीमुळे नाराजी
दरम्यान, भाजपातील हे मतभेद गेल्या महिन्यातच समोर आले होते. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच अशोका यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यामुळे काही नेत्यांत असंतोष निर्माण झाला होता. या नाराज नेत्यांमध्ये यत्नल, सी. टी. रवी, अरविंद लिंबावली, तसेच अरविंद बेल्लाड आदी नेत्यांचा समावेश आहे. विजयेंद्र यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर “भाजपा हा फक्त एका कुटुंबाचा पक्ष होणे योग्य नाही. पक्षाचे कार्यकर्ते याचा स्वीकार करणार नाहीत,” असे तेव्हा यत्नल म्हणाले होते. अशोका यांच्या निवडीवरही यत्नल यांनी नाराजी व्यक्त केली होती. “उत्तर कर्नाटकमधील एकाही नेत्याला पक्षाने संधी का दिली नाही. फक्त दक्षिण कर्नाटकमधील नेत्यांनाच संधी का देण्यात आली?” असे प्रश्न यत्नल यांनी उपस्थित केले होते.
अशोका यांचे स्पष्टीकरण
भाजपातील हे अंतर्गत मतभेद आणि नाराजी समोर आल्यामुळे अशोका यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “आमच्यात थोडासा गोंधळ निर्माण झाला. सभागृहात राहून विरोध करावा की सभागृहाचा त्याग करावा हे आम्ही ठरवीत होतो. मात्र, सभागृहाचा त्याग केला पाहिजे, असे यत्नल यांनी सुचवले. उत्तर कर्नाटकमधील दुष्काळावर चर्चा व्हावी यासाठी यत्नल यांनी तसे सुचवले होते,” असे स्पष्टीकरण अशोक यांनी दिले.
आम्ही सर्व जण एकत्रच
“आम्ही समोरच्या बाकावर बसलेल्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, समन्वय साधता न आल्यामुळे काही आमदार सभागृहातून बाहेर पडले; तर काही आमदारांनी तेथेच बसून घोषाणाबाजी केली. आम्ही सर्व जण एकत्रच आहोत. आम्ही आमच्या चुकांवर काम करू,” असे स्पष्टीकरण अशोक यांनी दिले.
विधिमंडळ पक्षाची बैठकच नाही?
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपा पक्ष अपेक्षेप्रमाणे आक्रमक दिसत नाहीये. सभागृहाचे कामकाज पार पाडण्यासाठी काँग्रेसला विशेष मेहनत घ्यावी लागत नाहीये. त्यावर बोलताना “अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली नव्हती. सध्या पक्षातील आमदार अनेक गटांत विभागले गेले आहेत,” असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे.