काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी येत्या २४ सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत होते. मात्र काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना तत्काळ बोलावल्यामुळे ते दिल्लीत पोहोचले आहेत. वेणुगोपाल आणि सोनिया गांधी यांच्यात पक्षातील संघटनात्मक तसेच इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरूर लढण्याच्या तयारीत, राहुल गांधी लढले नाही तर अशोक गेहलोतही लढणार

सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर भाष्य केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान नेतृत्व तटस्थ राहणार आहे. निवडणुकीसाठी कोणीही उभा राहू शकतो, हे आम्ही याआधीच जाहीर केले आहे. पक्षाची तसेच नेतृत्वाची तशी भूमिका आहे. निवडणुकीसाठी कोणीही उभे राहिले, तरी पक्षनेतृत्व तटस्थतेची भूमिका घेईल, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> त्रिपुरा : “भाजपाच्या पराभवासाठी काहीही करू,” काँग्रेसचे विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन

माजी खासदार राहुल गांधी यांनी ही निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरही वेणुगोपाल यांनी भाष्य केले. राहुल गांधी यांनी ही निवडणूक लढवणार की नाही याबद्दल आम्हाला काहीही सांगितलेले नाही. राहुल गांधी यांना स्वत: निर्णय घ्यायचा आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल जनतेला विश्वास आहे. मग काँग्रेसमधील कार्यकर्ते आणि नेत्यांना तो का असू नये? काही राज्यांनी राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, अशी विनंती करणारा ठराव मंजूर केला आहे. हा त्या-त्या राज्यातील प्रदेश काँग्रेसचा दृष्टीकोन आहे. पक्षातील नेत्यांना तेवढेही स्वातंत्र्य नसावे का? असे सवाल वेणुगोपाल यांनी केले आहेत.

हेही वाचा >>> कर्नाटक : भाजपामधील नाराजी चव्हाट्यावर! मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने माजी मंत्र्याने केले नेतृत्वाला लक्ष्य

दरम्यान, महाराष्ट्रासह, हरियाणा, केरळ, उत्तराखंड अशा एकूण १० राज्यांनी मिळून राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती करणारा ठराव मंजूर केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घेतली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जी-२३ गटातील नेते शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

Story img Loader