आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या लहान भगिनी व वायएसआर तेलंगणा पार्टीच्या (YSRTP) प्रमुख वाय. एस. शर्मिला यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्ली येथे गुरुवारी (३१ ऑगस्ट) भेट घेतली. त्यानंतर शर्मिला आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अशी चर्चा मे महिन्यापासूनच तेलंगणाच्या राजकारणात सुरू आहे. पक्षाचे विलीनीकरण करण्याच्या बदल्यात शर्मिला यांना तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीमध्ये महत्त्वाचे पद आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका दिली जाऊ शकते.

तथापि, तेलंगणा काँग्रेसमधील नेते मात्र शर्मिला यांच्या काँग्रेसप्रवेशाबद्दल फारसे उत्सुक नाहीत. शर्मिला या आंध्र प्रदेशमधील वायएसआर या प्रमुख राजकीय कुटुंबातील एक सदस्य आहेत. वायएसआर तेलंगणानिर्मितीच्या विरोधात होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन व शर्मिला यांचे वडील दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी हे काँग्रेसचे एक बडे नेते व संयुक्त आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले होते.

हे वाचा >> Video: “महाराष्ट्रातले सगळे पक्ष आम्हाला का घाबरतायत?” KCR यांचा राज्यातील सर्वपक्षीयांना खोचक सवाल; म्हणाले, “मला एक पक्ष सांगा ज्याला…!”

दोन महिन्यांपासून शर्मिला काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात प्रामुख्याने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा समावेश आहे. शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा विचार व्यक्त केला होता. डी. के. शिवकुमार हे वायएसआर कुटुंबीयांचे जवळचे मानले जातात. जून महिन्यात शर्मिला यांनी वायएसआरटीपी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबतचा विचार व्यक्त करून आपल्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपासून अंतर बाळगण्यास सुरुवात केली.

वायएसआरटीपीचे प्रवक्ते कोंडा राघव रेड्डी यांनी गुरुवारी (३१ ऑगस्ट) सांगितले की, शर्मिला यांच्या काँग्रेस नेत्यांसह झालेल्या बैठकीची त्यांना फारशी कल्पना नाही. माझ्या माहितीप्रमाणे पक्षाने तेलंगणातून गाशा गुंडाळला आहे. त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि तेलंगणाच्या राजकारणात उतरणार का, यावरच मोठे प्रश्नचिन्ह आहे. कारण- स्थानिक काँग्रेस नेत्यांना त्या पक्षात नको आहेत.

शर्मिला यांनी मात्र आंध्र प्रदेशमध्ये परतण्याच्या शक्यतेला नकार दिला आहे. आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा मोठ्या भावासमोर निभाव लागणार नाही. जगनमोहन सध्या वायएसआरसीपी पक्षाचे प्रमुख आहेत. वडिलांच्या निधनानंतर काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. शर्मिला यांना तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातील पलेयर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे; ज्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात नाराजीचा सूर पसरला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांनी या मतदारसंघात विद्यमान आमदार कंदाला उपेंद्र रेड्डी यांना नामनिर्देशित केलेले आहे. रेड्डी यांनी मूळात काँग्रेसच्या तिकीटावर या मतदारसंघात विजय मिळवला होता; पण कालांतराने त्यांनी बीआरएस पक्षात उडी मारली. बीआरएसने स्थानिक नेते व माजी आमदार थुम्माला नागेश्वर राव यांना या मतदारसंघातून तिकीट नाकारले होते. त्यामुळे ते पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून बाजूला झाले आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील काँग्रेस नेत्यांना या मतदारसंघात शर्मिला यांच्याऐवजी एखाद्या स्थानिक, मजबूत अशा काँग्रेसच्या उमेदवारास तिकीट द्यायचे आहे; जेणेकरून या मतदारसंघात सहज विजय मिळवता येईल.

हे वाचा >> विठुरायाच्या दर्शनासाठी केसीआर महाराष्ट्रात, सोबतीला ६०० गाड्यांचा ताफा! राज्याची राजकीय समीकरणं बदलणार?

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह बैठक झाल्यानंतर शर्मिला माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची आज भेट घेतली. आमच्यात अनेक मुद्द्यांवर ठोस अशी चर्चा झाली. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांची मुलगी म्हणून मी तेलंगणामधील लोकांच्या हितासाठी अथकपणे काम करीन आणि सर्वांत महत्त्वाचे सांगेन की, केसीआर यांची आता उलटी गिनती सुरू झालेली आहे.

कोण आहेत शर्मिला?

४९ वर्षीय शर्मिला यांनी ८ जुलै २०२१ रोजी आपले वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या जयंतीदिनी वायएसआर तेलंगणा पार्टीची (YSRTP) स्थापना केली होती. या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तेलंगणाच्या राजकारणात पाऊल ठेवले. आंध्र प्रदेशमध्ये अनेक राजकीय पक्ष आणि मातब्बर पुढाऱ्यांची भाऊगर्दी झाल्यामुळे त्यांनी आंध्रच्या राजकारणातून काढता पाय घेतला. त्यांचा स्वतःच्या भावाचा वायएसआर काँग्रेस पक्ष, तेलगू देसम पार्टी (TDP), जन सेना पार्टी (JSP), भाजपा आणि काँग्रेस यांचे राज्यात
मजबूत संघटन आहे. त्यामुळेच त्यांनी बाजूच्या तेलंगणामध्ये राजकीय भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न केला.

२० ऑक्टोबर २०२१ रोजी शर्मिला यांनी प्रजा प्रस्थानम यात्रा सुरू करून तेलंगणामधील ३३ जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढली. शर्मिला या मुख्यमंत्री केसीआर आणि भारत राष्ट्र समितीवर जोरदार टीका करीत असल्यामुळे अनेक ठिकाणी बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदयात्रेला लक्ष्य केले. राज्यातील पोलिसांनी परवानगी नाकारूनही त्यांनी आपली पदयात्रा सुरूच ठेवल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागला.