तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाला ओळख मिळावी यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली असून मागील काही दिवसांपासून ते राज्यात सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी सभा, बैठका घेताना दिसत आहेत. दरम्यान, पंढरपूरमधील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ते तब्बल ६०० गाड्यांचा ताफा घेऊन आले आहेत. या माध्यमातून ते महाराष्ट्रात शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार?

के चंद्रशेखर राव यांच्यासोबत तेलंगणातील मंत्री, पक्षाचे नेते महाराष्ट्रात आले आहेत. के चंद्रशेखर राव यांच्या सध्याच्या राजकीय भूमिकेमुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे के चंद्रशेखर राव यांच्या राजकीय डावपेचांकडे सर्वांचेच लक्ष आहे. पंढरपूरमधील विठ्ठलाचे दर्शन घेताना प्रवासात ते अनेकांची भेट घेणार आहेत. या निमित्ताने जनसंपर्क वाढवण्याचा के चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे.

केसीआर यांचा ताफा ६ किमी लांब?

भारत राष्ट्र समितीने के चंद्रशेखर राव यांचा ताफा साधारण ६ किलोमीटर लांब असल्याचा दावा केला आहे. पंढरपुरात येताना वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्याची परवानगी बीआरएसने मागितली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने ही परवानगी नाकारली आहे.

येताना प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवावे- देवेंद्र फडणवीस

के चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंढरपूरमधील मंदिराचा दरवाजा सर्वांसाठीच खुला आहे. भगवान विठ्ठलाची भक्ती करण्यापासून कोणालाही रोखता येत नाही,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. तर वारीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणी येत असेल तर त्यांचे स्वागतच करायला हवे. मात्र येताना प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून यावे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बीआरएसने मराठवाडा, विदर्भात अनेक सभा घेतल्या

बीआरएस पक्षाचे सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये प्राबल्य आहे. मात्र महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी बीआरएस पक्ष पंढरपूरची जत्रा आणि वारीकडे एक संधी म्हणून पाहात आहे. याआधी बीआरएसने मराठवाडा आणि विदर्भात अनेक सभा घेतल्या आहेत. तसेच नागपुरात बीआरएस पक्षाचे मुख्य कार्यालय उभारण्यात आले आहे. आगामी काळात पुणे, औरंगाबाद, मुंबई येथेही कार्यालय उभारण्याचा पक्षाचा मानस आहे.

बीआरएस भाजपाची बी टीम

दरम्यान, के चंद्रशेखर राव यांच्या या पक्षवाढीच्या प्रयत्नांमुळे महाविकास आघाडीसमोर अडचण उभी राहू शकते. याच कारणामुळे महाविकास आघाडीचे नेते बीआरएस पक्षाला भाजपाची बी टीम म्हणत आहेत. “महाविकास आघाडीची मतं कमी करून भाजपाला मदत करण्याचा बीआरएसचा प्रयत्न आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने दिली आहे.

Story img Loader