राजगोपाल मयेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दापोली हा सुरूवातीपासूनच काँग्रेस, जनता पक्ष आणि शिवसेना यांना प्रभाव विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात येथे जनसंघाचं अस्तित्व होते तरी पुढे भाजपला पक्षवाढीसाठी अनुकूल‌ वातावरण मिळालेच नाही. अशा परिस्थितीत २००० च्या पहिल्या दशकात भाजपला केदार साठे यांच्या रूपाने आक्रमक युवानेतृत्व मिळाले आणि पक्षाची प्रतिमा बदलण्यास खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. मुळात केदार साठे यांचा राजकारणाशी काडीमात्र संबंध‌ नव्हता. वडील पंचायत समितीत कृषी विस्तार अधिकारी आणि आई शिक्षिका, त्यांनी सुरूवातीचे शालेय शिक्षण रत्नागिरी-पाली येथे आणि तर महाविद्यालयीन शिक्षण दापोलीतील वराडकर महाविद्यालयात पूर्ण केले.

हेही वाचा… भास्कर अंबेकर : राजकारणाला सामाजिक कार्याची जोड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असलेले केदार साठे २००२ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सक्रीय झाले. वर्षभरातच त्यांनी भाजपच्या मुख्य प्रवाहात काम सुरू केले. शिवसेनेकडून निवडणुकीत जागावाटप आणि सत्तेतील पदांवरून शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्याचा तो काळ होता. अशा परिस्थितीत साठे यांनी नगरपंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले. कमी नगरसेवक असूनही स आक्रमक रणनीती राबवली. साहजिकच त्यामुळे भाजपचे नगरसेवक नगरपंचायतीत निर्णायक ठरू लागले. त्यांना पक्षाने तालुकाध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस अशा पदापर्यंत बढती दिली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूनही येण्याचा मानही त्यांनी मिळविला. २०१४ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी दापोलीत भाजपकडून केदार साठे यांना उमेदवारी मिळाली. सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत होते. त्यावेळी अवघ्या चाळिशीतल्या साठे यांनी चौदा हजार मते मिळवली.

हेही वाचा… सुनील टिंगरे : युवकांमध्ये लोकप्रिय

दुसऱ्या बाजुला दापोली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शंभर वर्षांहून अधिक जुन्या ए. जी. हायस्कूलमधील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी भरीव काम केले. २००६ पासून आजतागायत त्यांनी संचालक म्हणून केलेले प्रयत्न संस्थेच्या आणि तेथील विद्यार्थ्यांच्या प्रगतीत नवनवी उंची गाठण्यास कारणीभूत ठरत आहेत. संस्थेचा मातृभाषेतून शिक्षणाचा विद्याभारती हा नावीन्यपूर्ण उपक्रम आणि दापोली अर्बन महाविद्यालयाची गुणवत्तावाढ यामध्ये त्यांची मोलाची भूमिका ठरली. भाजपने आता त्यांच्याकडे उत्तर रत्नागिरी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देऊन भविष्यातील राजकीय युद्धाचे नव्याने रणशिंग फुकले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar sathe strengthening organizational work for organization print politics news asj