सौरभ कुलश्रेष्ठ

महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन भाजप सत्ताधारी झाल्यानंतर आता आगामी काळातील निवडणुका डोळ्यांसमोर आखणी सुरू झाली आहे. मुंबई व ठाण्यात पक्षाचे चांगले बस्तान बसले असताना नवी मुंबईच्या वेशीवरील पनवेल, पेण, उरण पट्टा सोडल्यानंतर सिंधुदुर्गपर्यंत कॉंग्रेसमधून आलेले नीतेश राणे वगळता भाजपचा एकही आमदार नसल्याची सल नेत्यांच्या मनात आहे. प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये संघ परिवाराला मानणारा वर्ग असताना भाजपचा आमदार निवडून न आल्याने आता लक्ष्य कोकण ही मोहीम भाजपने हाती घेतली आहे. तोच संदेश देण्यासाठी व विधानसभा निवडणुकीआधी रायगड ते सिंधुदुर्ग राजकीय मशागत सुरू करण्यासाठी प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी पनवेलमध्ये होत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे बस्तान चांगले बसले आहे. मुंबई व ठाणे, नवी मुंबईतही भाजपला कुठे पक्षाच्या बळावर तर कुठे दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे जम बसवणे सोपे जात आहे. पण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने यात भाजपला हवे तसे स्थान मिळवता आलेले नाही. आता शिवसेनेतील बंडानंतर सत्तांतर होऊन कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील आमदार शिंदे गटात सामील झाल्याने भाजपला पक्ष रुजवण्याची व आगामी निवडणुकीत आमदार निवडून येण्यासाठी तयारी करण्याची चांगली संधी मिळाली आहे. 

रायगडमध्ये ७ आमदार असून त्यापैकी भाजपचे दोन, एक भाजप समर्थक, शिवसेना तीन, राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे दोन्ही आमदार व तिसरा समर्थक हे नवी मुंबईच्या पट्ट्यात येतात. ग्रामीण भागात भाजपचा एकही आमदार नाही. तर रत्नागिरीमध्ये विधानसभेच्या ५ जागा असून त्यापैकी चार मतदारसंघात शिवेसेनेचे तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी असे बलाबल आहे. सिंधुदुर्गमध्ये तीन आमदार असून त्यापैकी दोन शिवसेनेचे तर एक नीतेश राणे हे भाजपचे आहेत. पण नीतेश राणे हे भाजपच्या नव्हे तर राणे कुटुंबाच्या ताकदीवर निवडून येतात. २०१४ मध्ये ते कॉंग्रेसमधून तर २०१९ मध्ये ते भाजपमधून निवडून आले. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भाजपचा एक आमदार सिंधुदुर्गात असला तरी रायगडचा ग्रामीण भाग, रत्नागिरी जिल्हा व सिंधुदुर्ग या भागात मूळ भाजपचा एकही आमदार नाही याची सल राज्यातील भाजप नेत्यांना आहे. सिंधुदुर्गमध्ये पूर्वी प्रमोद जठार हे मूळ भाजपचे कार्यकर्ते निवडून आले होते. पण त्यानंतर त्यांना यश आले नाही. 

आता सत्तांतरानंतर बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीत कोकणातील हिंदुत्ववादी मतदारांना आपलेसे करण्यासाठी व कोकणात भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी कोकण हेच लक्ष्य ठेवण्यात येत आहे. तो संदेश कोकणच्या भूमीवरून देण्यासाठी भाजपने मुंबई सोडल्यानंतर कोकणचे प्रवेशद्वार म्हटले जाणाऱ्या पनवेलमध्ये प्रदेश कार्यकारिणी ठेवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बैठकीचे उद्घाटन करणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समारोपाचे भाषण करणार आहेत. या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष असे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित राहतील. ही महत्त्वाची बैठक कोकणात ठेवण्यात येत आहे हा केवळ योगायोग नसून भाजप कोकणाला विशेष महत्त्व देणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

Story img Loader