दिल्ली आणि पंजाब काबीज केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपले लक्ष इतर राज्यांकडे वळवण्यास सुरवात केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नुकतीच अरविंद केजरीवाल यांनी केरळमध्ये नव्या युतीची घोषणा केली आहे. केरळमध्ये आम आदमी पक्ष टी २० या गटासोबत राजकीय आघाडी करत असल्याची घोषणा केली. टी २० ही केरळमधील गारमेंट क्षेत्रातील अग्रगण्य ‘किटेक्स’ समूहाची सीएसआर विंग आहे. या निर्णयामुळे आम आदमी पक्ष हा प्रत्येक राज्यात स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्थानिक पक्षांशी आणि गटांशी हातमिळवणी करून स्थानिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे हे स्पष्ट होते. यावेळी केजरीवाल म्हणाले की “केरळच्या लोकांसमोर आता दोन पर्याय उपलब्ध आहेत. असे राजकीय पक्ष ज्यांचा गुन्हेगारी कृत्यांमध्ये आणि दंगली घडवण्यात सहभाग आहे किंवा आप आणि टी २० सारखे प्रामाणिक पक्ष जे लोकहिताच्या कामात सहभागी आहेत”. 

टी 20 हा गट नेमका कोणाचा आहे ? 

 केजरीवाल यांनी पीपल्स वेल्फेअर अलायन्स ( पीडब्लूए)  असं नव्या आघाडीचे नाव असल्याचे सांगितले आहे. टी २० चे मुख्य समन्वयक साबू. एम जेकब असणार आहेत. जेकब हे ‘किटेक्स’ चे एमडी आहेत. ‘किटेक्स ही केरळमधील’ गारमेंट व्यवसायातील एक मोठी कंपनी आहे. ‘किटेक्स’चं मुख्यालय हे कोचिमधील किझक्कम्बलम येथे आहे. टी २० ही ‘किटेक्स’ ग्रुपची सीएसआर शाखा आहे. 

टी २० गटाशी आघाडी करण्याचं कारण काय ?

दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाला केरळमध्ये मोठ्या राजकीय आघाड्यांचा यशस्वी इतिहास असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी ( एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट ( यूडीएफ) यांचा समावेश आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील असलेली आघाडी एनडीए ही जात आणि धर्म यांच्याशी निगडित असल्यामुळे लोकांचे प्रश्न फारसे सुटले नाहीत असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच केजरीवाल यांनी टी२० या राजकीय गटाशी हातमिळवणी केली आहे. या माध्यमातून केजरीवाल स्थानिक लोकांशी पक्षाला जोडण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे. 

टी २० ची राजकीय पार्श्वभूमी

टी २० चे केरळमधील चार ग्रामपंचतींवर वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतींमध्ये किझक्कम्बलम ग्रामपंचायतीचा समावेश आहे. २०१५ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. टी २० ने २०२१ मध्ये विधानसभेच्या काही जागा लढवल्या. नंतर त्यांच्यावर सीजीआय ( एम) ची ‘बी” टीम म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा आरोप झाला. कॉर्पोरेट कंपनीची ही संघटना टी २० ने ज्या ८ मतदार संघात निवडणूक लढवली त्यापैकी ६ मतदार संघात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जागा मिळवली आणि भाजपाला चौथ्या क्रमांकावर ढकलले.

केरळमध्ये असलेली ‘आप’ची राजकीय ताकद

केरळमध्ये अगदी ग्रामपंचायत स्तरावरही ‘आप’चे अस्तित्व दिसून येत नाही. ‘आप’ ने २०१४ मध्ये केरळ युनिटची स्थापना केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने काही जागा लढवल्या होत्या. पण या निवडणुकीत ‘आप’ला सपशेल अपयश आले. इथे केजरीवाल यांनी काही प्रशासकीय अधिकारी, शेतकरी चळवळींशी जोडले गेलेले नेते पक्षाशी जोडले आहेत. मात्र अजूनही ‘आप’ला केरळमध्ये सक्षम नेतृत्वाची उणीव भासत आहे.

टी २० सोबत युतीची घोषणा करताना केजरीवाल यांनी केरळमधील लोकांना दिल्लीत ‘आप’ने केलेल्या कामाची माहिती दिली. ‘आप’ला दिल्लीप्रमाणेच केरळमध्ये काम करायचे असल्याचे सांगून साथ देण्भचे भावनिक आवाहन केले.

Story img Loader