Kerala Congress : केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. केरळमध्ये २०२६ मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणूक पाहता काँग्रेसनेही आतापासून मोठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. खासदार प्रियांका गांधी या देखील सातत्याने केरळ दौऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील २८ फेब्रुवारीला महत्वाची बैठक बोलावली. ही बैठक दिल्लीत होत असून या बैठकीत केरळ विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषगांने चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती सांगितली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शशी थरूर हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्याबरोबर त्यांनी सेल्फीही काढला होता. तसेच काँग्रेसने आपल्या नीतीमध्ये बदल करत मतपेटीच्या बाहेरचा विचार करून नव्या मतदारांना आकर्षित केले पाहिजे, असंही शशी थरूर यांनी म्हटलं होतं. त्यामुळे शशी थरूर हे काँग्रेस सोडून भाजपात जाणार का? याबाबत राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. मात्र, या चर्चांनंतर आज काँग्रेसच्या बैठकीला खासदार शशी थरूर उपस्थित राहणार असल्यामुळे अनेकांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे.
केरळच्या आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने मोठी तयारी सुरु केली आहे. या अनुषंगाने आज होत असलेल्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पक्षाचे प्रभारी, प्रदेश काँग्रेसचे प्रमुख, विधिमंडळ पक्षाचे नेते, खासदार आणि इतर ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे केरळ काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
काँग्रेस हायकमांड केरळमध्ये आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखत असतानाच केपीसीसीचे अध्यक्ष के सुधाकरन यांनी बुधवारी यासंदर्भात महत्वाचं भाष्य केलं. भारतीय काँग्रेस समितीने घेतलेल्या कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल, आम्ही त्या निर्णयाचं पालन करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एआयसीसीमधून कोणीही त्यांना पायउतार होण्यास सांगितलं नसल्याचं स्पष्ट करत सुधाकरन यांनी म्हटलं की, ‘पक्षाची पुनर्रचना करणे आणि केपीसीसी अध्यक्ष बदलण्याबाबत निर्णय घेणं हे पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे.’
पंतप्रधान मोदी सुफी संगीत महोत्सवात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नवी दिल्लीत भव्य सुफी संगीत महोत्सव जहां-ए-खुसरो २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या एका निवेदनात म्हटलं की, पंतप्रधान देशाच्या विविध कला आणि संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने ते जहाँ-ए-खुसरोमध्ये सहभागी होतील. जो सुफी संगीत, कविता आणि नृत्य यांना समर्पित आंतरराष्ट्रीय महोत्सव आहे. अमीर खुसरोचा वारसा सांगण्यासाठी जगभरातील कलाकार महोत्सवात जमतील. रुमी फाऊंडेशनद्वारे आयोजित प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि कलाकार मुझफ्फर अली यांनी २००१ मध्ये सुरू केलेला हा महोत्सव यावर्षी त्याचा २५ वा वर्धापनदिन साजरा करेल आणि २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आयोजित केला जाईल.