केरळचे माजी शिक्षणमंत्री एम. ए. बेबी यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)चे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) काँग्रेसच्या मदुराई येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे समन्वयक प्रकाश करात यांनी बेबी यांचे नाव सरचिटणीस पदासाठी सुचवण्यात आले होते. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या कार्यक्रमाचा आज रविवारी समारोप पार पडला. या कार्यक्रमात नियुक्तीचा निर्णय जाहीर करण्यात आला.
एम. ए. बेबी यांची कारकीर्द
बेबी (वय ७०) यांनी सीपीआय (एम)मधून राजकीय श्रीगणेशा केला. त्यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि नंतर पक्षाच्या युवा शाखा डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांपासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८६ ते १९९८ पर्यंत ते सीपीआय (एम)चे राज्यसभा खासदार होते.
पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेणारी संस्था पॉलिटब्यूरोमधील नेत्यांच्या एका गटानं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांचंही नाव सुचवण्यात आलं होतं. एम. ए. बेबी यांचीच पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली होती.
अशोक ढवळे हे एक लोकप्रिय नेते असल्याचं या गटाचं मत आहे आणि त्यामुळेच त्यांचं नाव सुचवण्यात आल्याचं बोललं जात होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर पक्षाचं सरचिटणीस पद रिक्त होतं. प्रकाश करात हे सध्या अंतरिम पदावर पक्षाचं कामकाज पाहत होते.
प्रकाश करात आणि वृंदा करात यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते ७५ वर्षांच्या वयोमर्यादेमुळे पॉलिटब्यूरोमधून पायउतार झाल्यानंतर एम. ए. बेबी हे पक्षाचे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.
सीपीआय (एम) पक्षाला पुन्हा नव्यानं जनतेला आकर्षित करण्याची गरज आहे, असं मानणाऱ्या नेत्यांमध्ये एम. ए. बेबी हे एक आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, “पक्षाला त्याचा जनाधार पुन्हा निर्माण करावा लागेल.” पक्षाचा प्रभाव सध्या केरळपुरताच मर्यादित आहे, जिथे त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे पॉलिटब्यूरोच्या सदस्यांपैकी एक आहेत आणि त्यांनीदेखील एम. ए. बेबी यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.