जवळपास दोन वर्षांपूर्वी म्हणजेच ३० जून २०२० रोजी घडलेल्या एका घटनेमुळे केरळच्या राजकारणात उठलेलं वादळ अद्याप शमण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे आणि आरोपींकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांमध्ये राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान थेट केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचंच नाव घेतल्यामुळे हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा परिणाम केरळमधील राजकारण ढवळून निघण्यामध्ये होऊ लागला आहे.
नेमकं काय झालंय?
हे प्रकरण वास्तविक दोन वर्षांपूर्वीचं आहे. ३० जून २०२० रोजी केरळमधल्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एक संशयित बॅग ताब्यात घेतली. पण ही बॅग थेट दुबईहून आली होती. शिवाय संयुक्त अरब अमिरातीच्या तिरुअनंतपुरममधल्या दूतावासातील एका अधिकाऱ्याच्या नावे ही बॅग आली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलमुळे ती बॅग तिथल्या तिथे उघडून पाहाता आली नाही. मात्र, आठवड्याभरानंतर ५ जुलै रोजी ही बॅग दिल्लीतील उच्चायुक्त आणि संबंधित दूतावासातील अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली आणि सगळा प्रकार उघड झाला. बॅगेमध्ये सुमारे १५ कोटी रुपयांचं तब्बल ३० किलो सोनं होतं!
स्वप्ना सुरेश यांना अटक
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासामध्ये दूतावासातील संबंधित अधिकारी म्हणजे स्वप्ना सुरेश नामक महिला अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला देखील चालवण्यात आला. याच खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्वप्ना सुरेश यांनी आता थेट केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यावरच खळबळजनक आरोप केला आहे. सोन्याच्या तस्करीमध्ये आणि संबंधित आर्थिक गैरव्यवहारामध्ये मुख्यमंत्री देखील सहभागी असल्याचं स्वप्ना सुरेश यांनी न्यायालयासमोर सांगितलं आहे. एवढंच नाही, तर विजयन यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कमला, एक माजी मंत्री के. टी. जलील आणि इतरांची नावं देखील घेतली आहेत.
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ, ‘बंदी सिंग’चं राजकारण आणि लोकसभा पोटनिवडणूक; संगरूरमध्ये राजकीय चढाओढ!
“एम. शिवशंकर (माजी मुख्य सचिव) यांनीच मला सांगितलं होतं की मुख्यमंत्री एक बॅग विसरले आहेत. तसेच शिवशंकर यांनी स्वत: ती बॅग सोडण्यासंदर्भात सीमाशुल्क अधिकाऱ्यांना फोन केला होता. कधीकधी तर दूतावास अधिकाऱ्यांच्या घरून मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मोठमोठे भांडे भरून बिर्याणी जात असे. पण या भांड्यांमध्ये बिर्याणीशिवाय अजून काही धातू देखील होते”, असा दावा देखील स्वप्ना सुरेश यांनी केला आहे.
दरम्यान, एकीकडे स्वप्ना सुरेश यांनी गंभीर आरोप केले असताना जलील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून सुरेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना सुरेश आणि ज्येष्ठ राजकीय नेते पी. सी. जॉर्ज यांनी मिळून गेल्या कित्येक महिन्यांपासून कटकारस्थान करत मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्यावर बदनामीकारक आरोप केले आहेत, असा दावा त्यांनी तक्रारीमध्ये केला आहे.
विदर्भातील अपक्ष आघाडीकडे जाणार की फडणवीसांकडे?
जलील यांचीही झाली होती चौकशी!
मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचे निकटवर्तीय असणारे जलील यांची देखील जुलै २०२०मध्ये सोने तस्करी प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. तत्कालीन उच्च शिक्षण आणि अल्पसंख्याक मंत्री असणारे जलील हे या प्रकरणात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या आणि ईडीच्या रडारवर होते. तपासाअंती हे देखील समोर आलं की जलील यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दुबईहून तब्बल १७ हजार किलो खजूर आणि ८ हजार कुराण ग्रंथाच्या प्रती मागवल्या आहेत. हे सर्व साहित्य त्यांनी त्यांचा जिल्हा असलेल्या मलप्पुरममध्ये वाटण्यासाठी नेल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.