काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी खासदार शसी थरूर उत्सुक असल्यामुळे या निवडणुकीत रंग भरू लागले आहेत. थरूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यास, थरूर विरुद्ध राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात लढत होऊ शकते. मात्र थरूर ज्या राज्यातून खासदार आहेत, त्याच राज्यातील नेतेमंडळी त्यांच्या बाजूने नाहीत. खासदार राहुल गांधी यांनीच पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळावे, असे येथील नेत्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> काँग्रेस अध्यक्षपदावरुन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना राहुल गांधींचं मोठं विधान, निवडणुकीला मिळणार वळण?

याबाबतचे सविस्तर वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. या वृत्तानुसार केरळमध्ये अनेक नेत्यांना राहुल गांधी यांनीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घ्यावीत असे वाटते. महाराष्ट्रासह, हरियाणा, केरळ, उत्तराखंड अशा एकूण १० राज्यांनी मिळून राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी विनंती करणारा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळेही येथील केरळमधील नेत्यांचा राहुल गांधी यांच्या यांनीच अध्यक्ष व्हावे असा सूर जोर धरू लागला आहे. याबाबत लोकसभेतील काँग्रेसचे व्हिप के सुरेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरुर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर वावरणारे नेते आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढू नये. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एक सर्वसहमतीची व्यक्ती असावी. राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, अशी आमची इच्छा असून आम्ही अजूनही राहुल गांधी यांना तशी विनंती करत आहोत, असे के सुरेश यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बडा नेता भारत जोडो यात्रा सोडून दिल्लीमध्ये दाखल; अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

खासदार बेनी बेहानन यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. शशी थरूर निवडणूक लढवतील असे मला मला वाटत नाही. काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाचे ते पालन करतील असे मला वाटते, असे मत बेहानन यांनी व्यक्त केले. मिळालेल्या माहितीनुसार थेट निवडणूक घेण्यापेक्षा सर्वसहमतीच्या उमेदवाराची काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र थरूर यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे ही निवडणूक रंजक ठऱण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरूर लढण्याच्या तयारीत, राहुल गांधी लढले नाही तर अशोक गेहलोतही लढणार

दरम्यान, २४ सप्टेंबरपासून या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. १ ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाईल. तर ८ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १७ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष निवडणूक होईल. १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

Story img Loader