Kerala Politics : केरळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच काँग्रेसचा मित्र पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगने (IUML) त्यांच्या यूडीएफ आघाडीच्या नेतृत्वासंदर्भात बोलण्यास सुरुवात केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला ‘आययूएमएल’ची युवा शाखा यूथ लीगने आयोजित केलेल्या एका महोत्सवात भाग घेत पक्षाचे राज्य प्रमुख सय्यद सादिक अली थंगल यांनी महत्वाचं विधान केलं आहे. थंगल यांनी म्हटलं की, “एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास ते यूडीएफचे नेतृत्व करण्यास तयार आहेत”, असं सूचक विधान त्यांनी केलं.
यूडीएफने निवडणुकीत विजय मिळवल्यास आययूएमएल मुख्यमंत्री बनण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सय्यद सादिक अली थंगल यांनी म्हटलं की, “काँग्रेसची इच्छा असेल तर ते होईल”, तसेच यावेळी त्यांनी पक्षाचे वरिष्ठ सहकारी पी.के.कुन्हालीकुट्टी यांच्याकडे लक्ष वेधलं आणि मुख्यमंत्री आधीच येथे आहेत असं म्हटलं. तसेच आययूएमएलला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याच्या शक्यतेवर थंगल यांनी म्हटलं की, ते नक्कीच होईल. तसेच विधानसभा निवडणुकीत कुनहालीकुट्टी आययूएमएलचे नेतृत्व करतील.
दरम्यान, २०१६ आणि २०२१ नंतर आता २०२६ मध्ये सत्ताधारी सीपीएम नेतृत्वाखालील एलडीएफला मागे टाकण्याचे उद्दिष्ट असले तरीही यूडीएफचे नेतृत्व करण्याच्या आययूएमएलच्या तयारीवर काँग्रेसने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिली नाही. विरोधी पक्षनेते (एलओपी) व्हीडी सतीसन, रमेश चेन्निथला आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (एआयसीसी) सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते पक्षाच्या वर्तुळात आघाडीवर दिसत आहेत.
सीएम शर्यतीवर चिंता व्यक्त करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री थिरुवंचूर राधाकृष्णन यांनी म्हटलं की, “आधी निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करू. निवडणूक जिंकल्यावरच मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न निर्माण होतो. पहिले प्राधान्य एकजुटीने निवडणुका लढवायला हवं, मगच बाकीच्या गोष्टी येतील.
आययूएमएलने १९७९ मध्ये केरळमध्ये मुख्यमंत्री सी एच मोहम्मद कोया यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले होते. तथापि त्यांचे सरकार केवळ तीन महिने टिकले होते. गेल्या अनेक दशकांपासून आययूएमएल केरळमध्ये तसेच केंद्रात काँग्रेसचा प्रमुख सहयोगी आहे. उत्तर केरळमध्ये आययूएमएल ही यूडीएफची लाइफलाइन मानली जाते. २००१ ते २००६ आणि २०११ ते २०१६ च्या आधीच्या यूडीएफ राजवटीत आययूएमएलने प्रचंड प्रभाव पाडला होता.